Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Hike Repo Rate : आरबीआयची रेपो दरात 50 बीपीएसने वाढ; EMI आणखी महागणार!

RBI Repo Rate Hike Sep 2022

RBI Hike Repo Rate : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची बुधवारपासून (दि. 28) सुरू असलेली द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आज संपली. ही बैठक संपल्यानंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करत असल्याची घोषणा केली.

RBI Hike Repo Rate : वाढत्या महागाईचे संकट, जगभरातील सेंट्रल बॅंकासह फेडरल बॅंकेने वाढवलेले व्याजदर या पार्श्वभूमीवर आज (दि. 30 सप्टेंबर) रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात (Repo Rate) 50 बेसिस पॉईंटने वाढ करत असल्याची घोषणा केली. आरबीआयच्या या घोषणेनंतर रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्के झाला. यामुळे सर्वसामान्यांच्या ईएमआयमध्ये आणखी वाढ होईल. दरम्यान, मॉनेटरी कमिटीतील 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्यास दुजोरा दिला होता.

सणासुदीच्या काळात महागाईची झळ! 

ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी आणि ईद-ए-मिलाद सारखे महत्त्वाचे सण आहेत. या उत्सवांदरम्यान भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या काळात स्थानिक पातळीवर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पण यावेळी त्यावरही निर्बंध येण्याची शक्यता आहे. विशेषकरून नवी गाडी, घर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सोनं-चांदी याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. तसेच यासाठी कर्ज घेण्याकडेही सामान्यांचा कल असतो. पण आता व्याज दराच्या वाढीमुळे सर्वसामान्यांवर परिणाम होणार आहे; तसेच कर्ज घेण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यात आहे.

ईएमआयसह सर्व प्रकारची कर्जे महागणार!

RBIने रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बॅंकांची सर्व प्रकारची कर्जे पुन्हा एकदा महागतील, ईएमआय वाढेल. या आर्थिक वर्षात आरबीआयने आतापर्यंत यापूर्वी तीनवेळा रेपो दरात वाढ केली. त्यामुळे आतापर्यंतचा रेपो दर 5.40 टक्के होता. तो आता वाढून 5.90 टक्के झाला. यामुळे अगोदरच वाढलेल्या ईएमआयने दबलेल्या ग्राहकांवर आणखी बोजा पडणार आहे.

शेअर मार्केटकडून RBIच्या निर्णयाचे स्वागत!

RBIने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केल्यानंतरही शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण दिसून येत आहे. विशेषत: बॅंकनिफ्टीने याचे जोरदार स्वागत केल्याचे दिसून येते. बॅंकनिफ्टीच्या निर्देशांकामध्ये 650 अंकांपर्यंत वाढ झाल्याची पाहायला मिळाली. जागतिक पातळीवरील स्थिती तसेच इतर महत्त्वाच्या देशांनी केलेली व्याजदरातील वाढीमुळे आरबीआयसुद्धा व्याज दरात वाढ करेल. याचा अंदाज मार्केटच्या स्थितीवरून दिसून आला.

Repo Rate म्हणजे काय? 

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) देशातील बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्या व्याजदराला रेपो  दर (Repo Rate) म्हणतात. बॅंकांना दररोजचे व्यवहार करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज भासत असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी बॅंका आरबीआयकडून (Reserve Bank of India) अल्प मुदतीचं कर्ज घेतात. या अल्प मुदतीच्या कर्जावर आरबीआय जो व्याजदर आकारते, त्या व्याजदराला रेपो दर किंवा रेपो रेट म्हटले जाते.

अमेरिकेतील महागाई अपेक्षेपेक्षा जास्त!

अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात व्याजदर 0.75% ने वाढवत तो 3% ते 3.25% इतका केला. तसेच 'फेडरल'ने व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेत सुद्धा दिले आहेत. अमेरिकेतील महागाई अपेक्षेपेक्षा खूपच जास्त आहे. ती कमी करण्यासाठी बँकेला नाईलाजाने व्याजदर वाढवण्याचे सत्र सुरुच ठेवावे लागेल, असे फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी म्हटलं. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयामुळे कर्जदारांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

ऑक्टोबरमध्ये ब्रिटनमधील महागाई दर 10 टक्क्यांवर जाण्याची शक्यता!

युरोपीय सेंट्रल बँकेने सुद्धा दोन आठवड्यापूर्वी व्याजदरात 0.75% वाढ केली होती. (ECB Hike Interest Rate by 75 basis points) ब्रिटनमधील महागाईशी दोन हात करणाऱ्या बँक ऑफ इंग्लंडने (BOE) तब्बल 0.50% ने व्याजदर वाढवला होता. बँक ऑफ इंग्लंडने सलग सातव्यांदा व्याजदर वाढवला. तो 1.75% वरुन 2.25% इतका केला. ऑक्टोबर महिन्यात ब्रिटनमधील महागाई दर 10% वर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.