Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'RBI'ने तिसऱ्यांदा व्याजदर वाढवला, सर्वच प्रकारची कर्ज महागणार!

RBI Repo Rate Hike

रिझर्व्ह बँकेने आज शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी रेपो दरात 0.50% वाढ केली. केंद्रीय बँकेने आज अपेक्षेनुसार द्वैमासिक पतधोरणात दरवाढ केली. यामुळे नजीकच्या काळात सर्वच प्रकारची कर्जे महागणार हे जवळपास निश्चित आहे.

रिझर्व्ह बँकेने आज शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी रेपो दरात (Repo Rate) 0.50% वाढ केली. आता रेपो दर 5.4% इतका झाला आहे. व्याजदर कोरोनापूर्व स्तरावर आला आहे. यामुळे नजीकच्या काळात बँकांकडून गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे तसेच व्यावसायिक कर्जाचे व्याजदर वाढवले जातील. आरबीआयची पॉलिसी जाहीर होताच सेन्सेक्स 180 अंकांनी वधारला. चलन बाजारात डॉलरच्या तुलेनत 37 पैशांनी वधारला आणि तो 79.10 इतका झाला.(RBI Hike Repo Rate by 0.50% Today)

वाढती महागाई आणि जागतिक पातळीवरील घडामोडींचा विचार करता 'आरबीआय'ने यापूर्वीच दोन वेळा व्याजदर वाढवले होते. मे आणि जूनमध्ये रेपो दरात एकूण 0.90% वाढ केली होती. यावेळी देखील ग्लोबल ट्रेंडनुसार रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ करण्याचा कित्ता गिरवला. पतधोरणातील सर्वच सदस्यांनी 0.50% व्याजदर वाढवण्याचा एकमुखी निर्णय घेतला असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. दास पुढे म्हणाले की, सध्या देश महागाईशी सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचा विकास दराचा अंदाज कमी केला असून मंदीचे भाकीत केले. मागील काही महिन्यात देशातून 13.3 अब्ज डॉलर्सचा ओघ बाहेर गेला असल्याबाबत गव्हर्नर दास यांनी चिंता व्यक्त केली.

चलन बाजाराला स्थिरता देण्यासाठी परकिय चलनाबाबतच्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे दास यांनी सांगितले. महागाई आणि जागतिक पातळीवरील ट्रेंड पाहता रिझर्व्ह बँक रेपो दरात किमान 0.75% वाढ करेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आज आरबीआयने दरवाढ जाहीर केली.

गृह कर्ज, वाहन कर्ज महागणार

सलग तिसऱ्यांदा बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केल्याने कर्जदांरांची डोकेदुखी वाढणार आहे. रेपो दर 5.4% इतका वाढला आहे. त्यामुळे आता बँकांकडून एमसीएलआर दरात वाढ केली जाईल. पॉलिसी जाहीर होण्यापूर्वी तीन बँकांनी आणि एचडीएफसी या कंपनीनं कर्जदर वाढवला होता. बँक ऑफ इंडिया, पीएनबी बँक, आयसीआयसीआय बँक तसेच एचडीएफसी यांनी कर्जदरात वाढ केली. 1 ऑगस्ट 2022 पासून या बँकांची कर्जे महागली आहेत.

पॉलिसी जाहीर होताच दिसला परिणाम

आरबीआय पॉलिसी जाहीर होताच शेअर मार्केट, करन्सी मार्केटमध्ये त्याचे पडसाद उमटले. सकाळी 10 वाजता सेन्सेक्स 180 अंकांनी वधारला. निफ्टी 45 अंकांनी तेजीत होता. चलन बाजारात डॉलरच्या तुलेनत 37 पैशांनी वधारला आणि तो 79.10 इतका झाला. इंडिया 10 इयर बॉंड यिल्डमध्ये 0.07% ची वाढ झाली आणि तो 7.23% झाला.