टाटा समुहाची (Tata Sons) समाजाशी असणारी बांधिलकी जपणारे या पिढीतले टाटा आहेत रतन टाटा (Ratan Tata) ! जे आर डी टाटांनंतर (J R D Tata) त्यांनी समुह आणखी आधुनिक (Modern) बनवला, त्याता नवी दिशा (Vision) दिली. आणि विस्तारही केला. आता निवृत्त झाल्यानंतरही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जोडले गेले आहेत. आणि तिथं त्यांचा मोठा चाहता वर्गही आहे.
सोशल मीडियावरच्या आपल्या तरुण मित्रांना रविवारी (15 जानेवारी) रतन टाटांनी पूर्ण केलेल्या एका संघर्षपूर्ण स्वप्नाची आठवण करून दिली. टाटा इंडिका या कारबरोबरचा त्यांचा फोटो त्यांनी शेअर केलाय. आणि खाली लिहिलंय, ‘तुला माझ्या ह्रदयात कायम विशेष स्थान असेल!’
असं रतन टाटांनी म्हणण्यामागे मोठी कहाणी आहे.
टाटा इंडिका = इंडियाची कार
इंडिकाचं नावही रतन टाटांनीच दिलं होतं. कारण, त्यांच्या डोक्यात संकल्पना स्पष्ट होती. संपूर्ण देशी बनावटीची प्रवासी गाडी त्यांना बनवायची होती. भारतात बनलेली कार म्हणून इंडिका! त्यामुळे सोशल मीडिया संदेशात टाटा यांनी सुरुवातीलाच लिहिलंय, ‘25 वर्षांपूर्वी टाटा इंडिकाच्या लाँचमुळे भारतात भारतीय बनावटीच्या कार उत्पादनाला सुरुवात झाली. माझ्यासाठी ही खास अशी आठवण आहे.’
या कारचं डिझाईन आणि उत्पादनात रतन टाटा यांनी विशेष लक्ष घातलं होतं. इतकंच नाही तर टाटा समुहाचं प्रवासी गाड्यांच्या क्षेत्रात पदार्पणही टाटांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दूरदृष्टीने झालं. दोन वर्षांत चाचा इंडिका लोकप्रिय झाली. आणि पुढे इंडिगो, व्हिस्टा आणि मांझा अशी मॉडेल टाटा कंपनीने काढली. 2018 मध्ये टाटा समुहाकडून इंडिका गाडीचं उत्पादन बंद करण्यात आलं.
रतन टाटांचा कार उत्पादनाचा संघर्षमय प्रवास
दोन वर्षांत कार लोकप्रिय झाली असं म्हटलं असलं तरी ती दोन वर्षं रतन टाटांसाठी खूप कठीण होती. कारण, गाडीला तेव्हा स्पर्धा होती ती मारुती सुझुकी आणि हुंदाई सँट्रोची. आणि या दोघांच्या तुलनेत इंडिकाला तज्ज्ञांनी चांगले गुण दिले नव्हते. त्यामुळे कारची सुरुवात काहीशी धिमी झाली.
दुसरीकडे, जमशेदपूरच्या कारखान्यात उत्पादन सुरू होतं. कंपनीचं नुकसान वाढत गेलं. आणि टाटा सन्सच्या संचालक मंडळाकडून रतन टाटांवर दबाव आला कार व्यवसाय फोर्ड कंपनीला विकण्याचा. याविषयीची आठवण टाटा मोटर्समध्ये रतन टाटांबरोबर काम केलेले प्रवीण कडले यांनी मीडियाला सांगितली आहे.
फोर्ड कंपनीशी करार करण्यासाठी रतन टाटा अमेरिकेलाही गेले होते. तीन तास ही बैठक चालली. बैठकीत फोर्ड कंपनीचे संचालक बिल फोर्ड यांनी टाटांना जमत नसताना कार उद्योगात का शिरलास असंही विचारल्याचं कडले सांगतात.
पण, हा अपमान रतन टाटा यांनी सकारात्मकपणे घेतला. कार उत्पादनावर मेहनत घेतली. आणि येणाऱ्या वर्षांत फोर्ड कंपनीचा कार उत्पादनातला मोठा हिस्सा टाटांनी विकत घेतला. आणि युरोपात रोल्स रॉईस आणि जॅग्वार ब्रँडमध्येही मोठी गुंतवणूक केली.
म्हणूनच म्हटलं टाटा इंडिका ही आहे रतन टाटांच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी. रविवारी रतन टाटा यांनी इंडिका गाडीविषयी पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनीही त्याला जोरदार प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 28 लाखांच्या वर लाईक्स या पोस्टला मिळाले आहेत. आणि लोकांनी प्रतिक्रिया देताना आपल्या इंडिका कारबरोबरच्या आठवणीही शेअर केल्या आहेत.