राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची वेगळी ओळख शेअर बाजार गुंतवणूकदारांना (Share Market Investors) करून देण्याची गरज नाही. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांचं निधन झालं. पण, शेअर बाजारातून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या या शेअर दलाल (Share Broker) आणि गुंतवणूकदाराला भारतातला पहिला ‘Big Bull’ किंवा भारताचा वॉरन बफे असंही म्हटलं जातं. राकेश झुनझुनवाला यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे त्यांच्याकडे शेअर बाजारात गुंतवण्यासाठी सुरूवातीला भांडवल होतं फक्त 5000 रुपये. पण, त्यांचं निधन झालं तेव्हा कुटुंबीयांसाठी त्यांनी 47,000 कोटी रुपयाची मालमत्ता मागे सोडली होती. हा आकडा फोर्ब्सने (Forbes) दिलेला आहे.
राकेश झुनझुनवाला आज हयात नाहीत. पण, शेअर बाजार गुंतवणुकीसाठी त्यांनी दिलेले हे पाच सल्ले नक्कीच उपयोगी पडतील असे आहेत. वेगवेगळ्या भाषणांमधून त्यांनी यांचा उल्लेख केला आहे.
राकेश झुनझुनवाला यांचे शेअर बाजार गुंतवणुकीचे 5 मंत्र
योग्य शेअर खरेदी करा, थांबण्याची तयारी ठेवा, अजिबात घाबरू नका
या मंत्राला इंग्रजीत buy right, sit tight, don’t panic असं म्हणतात. कंपनीचं क्षेत्र आणि त्या क्षेत्रातली तिची कामगिरी याचा स्वत: अभ्यास करा. असा अभ्यास वाढवा. आणि एकदा शेअर खरेदी केलात की योग्य संधीची वाट पाहा, असं ते म्हणायचे. ‘तुमच्यामध्ये पोकळ आक्रमकता नाही तर सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता बाणवा. चांगल्या बरोबर वाईट अनुभव घेण्याी तयारी ठेवा. आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूचे घाबरले तरी तुम्ही घाबरू नका.’ असं झुनझुनवाला यांनी त्यांच्याच एका व्हीडिओमध्ये म्हटलं आहे. थोडक्यात, कोणी म्हणतं म्हणून शेअर खरेदी करू नका. त्याचा अभ्यास करा. आणि मग गुंतवणुकीला वेळ द्या.
प्रवाहाच्या विरोधात पोहायला शिका
‘Go Against Tide’ हा तर झुनझुनवाला यांच्या आयुष्याचाच मंत्र होता. ते म्हणायचे, ‘इतर लोक शेअर विकत असतील तेव्हा तुम्ही तो विकत घ्या. आणि बाकीचे विकत घेत असतील तेव्हा तो विका.’ अर्थात, त्या कंपनीवर तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे. आणि भविष्यात कंपनी वर जाईल याचा भरवसा तुम्हाला पाहिजे.
पण, स्वत: झुनझुनवाला यांनी ही रणनिती आयुष्यभर वापरली. शेअर बाजारात घसरण झालेली असताना (गुंतवणूकदार विक्री करत असताना) ते मोठ्या कंपन्यांचे शेअर जमवायचे. आणि शेअर बाजार वर चढलं (गुंतवणूकदार खरेदी करत असताना) ते शेअर विकून नफा कमवायचे. अर्थात, बाजार खाली असताना गुंतवणूक करणे ही एक जोखीमही आहे. पण, झुनझुनवाला यांनी ती घेतली. कारण, कंपन्यांचा त्यांनी केलेला अभ्यास चोख असेल अशी त्यांना खात्री होती.
कमी मुदतीत केलेलं ट्रेडिंग आणि दीर्घकालीन गुंतवणूक यांचं चांगलं मिश्रण त्यांच्या गुंतवणुकीत होतं.
भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक करू नका
शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते असं ते नेहमी म्हणायचे. पण, त्याचबरोबर एखाद्या कंपनीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, म्हणून मी हा शेअर घेतला, अशा विचारांना त्यांच्याकडे थारा नव्हता. त्यांनीच आपल्या 50व्या वाढदिवसाला त्याबद्दल सांगितलं होतं.
‘मला भावना आहेत. पण, त्या माझ्या जवळच्या माणसासाठी. शेअर किंवा शेअर बाजाराविषयी नाही. कृतज्ञता जरुर आहे. पण, माझे गुंतवणुकीचे कुठलेही निर्णय मी भावनेच्या भरात घेत नाही.’
शेअर बाजारातली गुंतवणूक, शेअर कधी खरेदी करायचा किंवा विकायचा हे काटेकोरपणे ठरवा. त्यात भावनाशीलना नसूदे असं ते शेवटपर्यंत म्हणायचे. याला ते गुंतवणुकीची शिस्त असा वाक्प्रयोग वापरायचे.
अवाजवी दराने शेअर विकत घेऊ नका
तुम्ही कंपनीचा अभ्यास करून एखादी कंपनी निवडलीत. पण, ती महाग असेल तर उगीच त्यात गुंतून पडू नका. आणि त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी शेअरचं मूल्य आधी तपासा असं झुनझुनवाला नेहमी म्हणायचे. ‘ज्या कंपन्या नेहमी न्यूजमध्ये असतात, अशा कंपन्या तुम्हाला ट्रेडिंगसाठी कधी कधी उपयोगी पडतात. पण, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शक्यतो नाही. त्यामुळे अशा कंपन्या टाळा. आणि तुमच्या अभ्यासातून नवीन उभारी घेणाऱ्या कंपन्या शोधून काढा.’
स्वत: झुनझुनवाला यांनी अगदी सुरुवातीच्या काळात टायटन कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. आणि या गुंतवणुकीनंतरच त्यांची ओळख निर्माण झाली. तेव्हा टायटन कंपनीचा शेअर दोन आकडी होता. पण, शेअर वाढला आणि झुनझुनवाला यांचीही भरभराट झाली.
झोमॅटो, पेटीएम, नायका या कंपन्यांचं आयपीओच्या वेळी मूल्यांकन अवाजवी होतं, असंच झुनझुनवाला यांचं म्हणणं होतं. आणि पुढे हे शेअर नोंदणीनंतर कोसळलेलेही आपण पाहिले.
परताव्याची वाजवी अपेक्षा
शेअर बाजारातून आपल्याला महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा अपेक्षित असतो हे ठिकच आहे. पण, म्हणून अवाजवी परताव्याची अपेक्षाही चुकीची असल्याचं झुनझुनवाला सांगायचे. ‘आपले स्वत:चे पैसे गुंतवा. त्यामुळे ते गमावल्याचं दु:ख तुम्हाला असेल. आणि तुम्ही काळजीपूर्वक गुंतवणूक कराल. घेतलेली जोखीमही अभ्यासपूर्ण असेल असं पाहाल,’ असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
‘तुमच्या पोर्टफोलिओवर तुम्हाला 18% परतावा मिळाला तर तुम्ही राजे आहात. आणि 21% परतावा मिळाला तर सम्राट,’ असं ते एका SIP मेळाव्यात म्हणाले होते.
(Disclaimer - महामनी कुठलाही शेअर बाजार गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. वाचकांनी आपली गुंतवणूक स्वत:च्या जोखमीवर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी)