भारतात दरवर्षी हजारो लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहेत. ऑनलाइन माध्यमातून आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढण्यासोबतच सायबर गुन्हेगार देखील नवनवीन माध्यमातून लोकांची लूट करत आहेत. लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी व त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय फसवणूक जागरूकता सप्ताह (International Fraud Awareness Week 2023 ) आयोजित करण्यात आला होता.
तुम्हाला देखील वारंवार मेसेज, मेलच्या माध्यमातून अशाप्रकारेच मेसेज येत असतील अथवा आर्थिक फसवणूक झाल्यास कोठे तक्रार करू शकता याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.
फसवणूक झाल्यास त्वरित करा ‘हे’ काम
ऑनलाइन फसवणूक झाल्यास सर्वात प्रथम तुमच्या बँकेला याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून डेबिट कार्ड बंद करण्यास सांगू शकता. आरबीआयच्या नियमानुसार अशाप्रकारे फसवणूक झाल्यास 3 दिवसांच्या आत बँकेकडे तक्रार करणे गरजेचे आहे. बँकेकडून फसवणुकीची सत्यता पडताळली जाईल व त्याआधारावर 10 ते 90 दिवसांच्या आत गेलेली रक्कम तुम्हाला परत मिळेल.
याशिवाय, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये देखील याबाबत तक्रार दाखल करू शकता. या तक्रारीचा फायदा तुम्हाला पैसे परत मिळविण्यासाठी होईल. तुम्हाला बँक खात्याशी संबंधित, एटीएम कार्ड बंद होईल अथवा केवायसी प्रक्रियेबाबत मेसेज आल्यास याची बँकेच्या माध्यमातून सत्यता तपासू शकता.
या ठिकाणी करा तक्रार
तुम्हाला अनोळखी क्रमांकावरून बँकेशी संबंधित अथवा इतर कोणतेही मेसेज आल्यास 14448 या टॉल-फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार दाखल करू शकता. याशिवाय, सायबर क्राईमच्या 155260 अथवा 1930 क्रमांकावर कॉल करता येईल. तसेच, चंदीगड येथील आरबीआयच्या ऑफिसला तक्रारीचे पत्र पाठवू शकता.
ऑनलाइन करू शकता तक्रार
ऑनलाइन फसवणुकीची आरबीआयकडे ऑनलाइन तक्रार करणे देखील शक्य आहे. आरबीआयकडे फसवणुकीची ऑनलाइन तक्रार करण्यासाठी https://cms.rbi.org.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
सरकारद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी www.cybercrime.gov.in ही वेबसाइट देखील सुरू करण्यात आली आहे.
- सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी सर्वात प्रथम www.cybercrime.gov.in वर जा.
- येथे 'File a complaint' पर्यायावर क्लिक करून 'Report other cybercrime' वर जा.
- आता 'citizen login' पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुमची माहिती भरा. त्यानंतर आलेला ओटीपी व्हेरिफाय करा.
- त्यानंतर तुम्हाला तक्रारीची माहिती द्यावी लागेल. तक्रारीचा फॉर्म भरून सबमिट करा.
- तक्रार सबमिट केल्यानंतर तुम्हाला तक्रार क्रमांक व इतर माहितीचा मेसेज येईल.