Gold Investment Pros and cons: सोने खरेदी ही भारतीयांसाठी एक पर्वणी असते. सध्या तर लग्नाचा सिझन सुरू आहे; त्यात अक्षयतृतीया (Akshaya Tritiya 2023) चार दिवसांवर आली आहे. त्यामुळे सोन्याच्या दुकांनामध्ये लगबग वाढली आहे. सोने खरेदीतून गुंतवणूकही होते आणि सण उत्सवात दागिने घालून मिरवताही येते. दुकानातून सोने विकत घेऊन तुम्ही घरी ठेवता त्यास फिजिकल गोल्ड असे म्हणतात. मात्र, याचे काही फायदे तसे तोटेही आहेत. या लेखात पाहूया फिजिकल गोल्डमधील गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय आहेत?
सोने खरेदीचे तोटे काय आहेत?
दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेच द्यावे लागतात?
जेव्हा तुम्ही दुकानात जाऊन सुवर्ण खरेदी करता त्यावर तुम्हाला मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. म्हणजेच सोन्यापासून दागिने घडवताना जो खर्च येतो तो ग्राहकांना द्यावा लागतो. हे शुल्क 8 ते 35 टक्क्यांपर्यंत असून शकते. एकूण खरेदी किंमतीच्या प्रमाणात मेकिंग चार्ज द्यावे लागतात. डिजिटल गोल्ड खरेदी करताना असे शुल्क द्यावे लागत नाही. मात्र, डिजिटल गोल्डमध्ये इतरही शुल्क समाविष्ट असतात. जेव्हा तुम्ही सोने विकण्यास जाता तेव्हा मेकिंग चार्जेस विचारात घेतले जात नाहीत.
घरात ठेवलेल्या सोन्याची सुरक्षा?
सोने खरेदी करून घरात ठेवत असाल तर त्याची सुरक्षेची जबाबदारीही तुमच्यावर पडते. सुवर्ण हा अत्यंत महाग धातू आहे. घरामध्ये सोने ठेवल्यास चोरीचा धोकाही असतो. जर तुमच्या घरातील सोने चोरी गेले तर मोठे नुकसान होऊ शकते. वृत्तपत्रांमध्ये तुम्ही दररोज सोने चोरीच्या बातम्या वाचत असाल. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची सुरक्षा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बँक लॉकरमध्येही सोने ठेवू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
सोने खरेदीवर जीएसटी भरावा लागेल?
जर तुम्ही दुकानात जाऊन सोने खरेदी करत असाल तर मेकिंग चार्जेस बरोबरच तुम्हाला वस्तू आणि सेवा करही भरावा लागेल. सोन्यावरती 3% जीएसटी आकारला जातो. म्हणजेच तुम्ही 1 लाखाचे सोने खरेदी करत असाल तर त्यावर तुम्हाला 3 टक्के जीएसटी म्हणजेच 3 हजार रुपये द्यावे लागतील. मेकिंग चार्जेस आणि जीएसटी मिळून ही रक्कम मोठी होते.
घरातील सोने उत्पन्नाचा स्रोत ठरत नाहीत?
जेव्हा तुम्ही सुवर्ण खरेदी करून घरातील तिजोरीत ठेवता तेव्हा तुम्हाला कोणताही फायदा त्यापासून मिळत नाही. या उलट तुम्ही गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यावर व्याज मिळते. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यावर व्याज मिळते. फक्त घरात सोने ठेवून फायदा होत नाही. मात्र, सोने गहाण ठेवून तुम्ही कर्ज काढू शकता.
दागिने पॉलिश आणि नव्याने घडवण्याचा खर्च
जर तुम्ही घरी सोन्याचे दागिने ठेवत असाल तर काही वर्षांनी त्याची चमक कमी होते. हे दागिने पॉलिश करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. तसेच पाच दहा वर्ष घरामध्ये दागिने असतील तर त्याचे डिझाइनही जुनी होते. जर तुम्ही या दागिन्यांचे नवे डिझाइन बनवून घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा मेकिंग चार्जेस द्यावे लागतील.
फिजिकल गोल्ड खरेदीचे फायदे?
गोल्ड बार खरेदी करताना शुल्क लागू होत नाही
तयार दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. मात्र, जेव्हा तुम्ही 24 कॅरेट गोल्ड बार खरेदी करता तेव्हा त्यावर तुम्हाला शुल्क द्यावे लागत नाही. दागिने तयार त्या दागिन्यांवरील हे शुल्क 8 ते 35 टक्क्यांपर्यंत असू शकते. हे पैसे गोल्ड बार खरेदी किंवा सोन्याची बिस्किटे खरेदी करताना वाचतील.
सोन्याचे पारंपरिक महत्त्व
कोणत्याही सण-उत्सवाला भारतामध्ये सोन्याची आभूषणे आवडीने घातली जातात. सोने खरेदीसोबत भारतीयांच्या भावनाही जोडलेल्या असतात. गुंतवणुकीबरोबरच तयार दागिने घरात असतील तर तुम्ही सण उत्सवाला हे दानिगे घालू शकता. महिला आणि पुरुष दोघांसाठीही अनेक प्रकारच्या ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे डिजिटल स्वरुपात सोने ठेवण्यापेक्षा काही जण घरामध्ये सोने ठेवतात. महत्त्वाच्या सणांसाठी सोने खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते.
सोने तारण कर्ज
तुमच्याकडे फिजिकल गोल्ड असेल आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली तर तुम्ही सोने तारण ठेवून कर्जही काढू शकता. ही प्रक्रिया सोपी असून जास्त कागदपत्रांची गरज भासत नाही. तसेच हे कर्ज देखील सुरक्षित असते. तुम्हाला पैशांची गरज भागवताना सोने विकायची गरज नाही. काही बँका गोल्ड लोन देण्यावर कोणतेही शुल्क आकारत नाहीत. किती कॅरेटचे सोने तुमच्याकडे आहे यानुसार कर्ज मिळते. जेवढी सोन्याची किंमती आहे, त्यापेक्षा कमी रकमेचे कर्ज मिळते.