बरेचजण कुटुंबातील सदस्य, नातेवाईकांना मालमत्ता भेट म्हणून देत असतात. परंतु, भविष्यात वाद निर्माण झाल्यास अशा मालमत्तेच्या मालकी हक्का प्रश्न निर्माण होतो. मालमत्तेची मालकी नक्की कोणाची ? विक्रीचा अधिकार कोणाचा? भेट म्हणून दिलेली मालमत्ता परत घेता येते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या सर्व प्रश्नांची या लेखातून जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
गिफ्ट डीड (Gift Deed) म्हणजे काय?
एखाद्याला भेटवस्तू देणे ही सर्वसाधारण बाब आहे. एखाद्या खास दिनानिमित्ताने किंवा वाढदिवसानिमित्ताने आपण अनेकांना काहीना काही भेटवस्तू देतो. अशा भेटवस्तू देताना कोणतीही नियमावली नसते व कोणतीही नोंदणी करावी लागत नाही. मात्र, मालमत्ता जसे की घर, जमीन एखाद्याला भेट म्हणून देताना कायद्याचे पालन करावे लागते.
जेव्हा आपण नियमितपणे घर, जागा खरेदी करतो अशा व्यवहारामध्ये पैशांची देवाण-घेवाण होत असते. मात्र, गिफ्ट डीडमध्ये अशाप्रकारे आर्थिक व्यवहाराचा समावेश नसतो. तुम्ही तुमची मालमत्ता स्वच्छेने इतरांना भेट म्हणून देत असता. एखादी वस्तू भेट देताना आपण कोणतेही पैसे घेत नाही, त्याप्रमाणे मालमत्ता भेट स्वरुपात देताना पैशांचा संबंध नसतो. थोडक्यात, नातेवाईक, कुटुंब अथवा इतर व्यक्तींना मालमत्ता भेट स्वरुपात देणे म्हणजे गिफ्ट डीड (बक्षीसपत्र) होय. हा व्यवहार विनामोबदला होतो.
कोणाला भेट देऊ शकता मालमत्ता?
ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, 1882 च्या कलम 122 नुसार तुम्ही कोणतीही स्थावर मालमत्ता भेट म्हणून इतरांना देऊ शकता. मालमत्ता भेट म्हणून दिल्याने विक्री करार केला जात नाही. परंतु, कायद्याचा कलम 123 नुसार याची उपनिबंधक कार्यालयात बक्षीसपत्र म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते.
कुटुंबातील सदस्य जसे की, आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलींना, नवरा-बायकोने एकमेकांना मालमत्ता भेट दिलेली असल्यास नोंदणीसाठी खूपच कमी स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. परंतु, तुम्ही जर कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त बाहेरील कोणाला मालमत्ता भेट म्हणून देत असाल तर यावर विक्री मुल्यानुसार स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
एकदा दान केलेली संपत्ती परत घेता येते का?
एकदा भेट म्हणून दिलेली मालमत्ता तुम्ही परत घेऊ शकत नाही. बक्षीसपत्र म्हणून या मालमत्तेची नोंदणी झालेली असते. अशावेळी मालमत्तेची मालकी ही तुम्ही ज्या व्यक्तीला भेट म्हणून दिलेली आहे, त्यांच्याकडे जाते.
मात्र, बक्षीसपत्र करार करताना तुम्ही त्यामध्ये काही विशिष्ट अटींचा समावेश केला असल्यास, मालमत्ता परत मिळवू शकता. भेट म्हणून मिळालेल्या व्यक्तीने करारामधील अटींचे पालन केले नाही, या कारणास्तव मालमत्ता परत मिळवता येते. परंतु, यासाठी करार करताना अशा अटींचा त्यात समावेश असणे गरजेचे आहे. दोन्ही पक्ष सहसंमतीने अशा अटींचा यात समावेश करू शकतात, ज्यामुळे भविष्यात कोणताही अडथळा येणार नाही. तसेच, धमकावून किंवा फसवणुकीने मालमत्ता बळकावली असल्यास न्यायालयात जाता येते.
दान केलेली संपत्तीची विक्री करू शकता का?
एखाद्याला मालमत्ता दान केली असल्यास तुम्हाला त्याची विक्री करता येणार नाही. एकदा तुम्ही बक्षीसपत्राची नोंदणी केल्यास मालमत्तेवरील संपूर्ण मालकी त्या व्यक्तीची असते. परंतु, ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 च्या कलम 126 अंतर्गत काही कारणास्तव बक्षीसपत्र करार रद्द करू शकता.
भेट म्हणून मिळालेली संपत्तीची विक्री करता येईल का?
भेट म्हणून मिळालेल्या मालमत्तेवर तुमची पूर्ण मालकी असल्याने तुम्ही सहज विक्री करू शकता. तुम्ही नियमित पद्धतीने अशा मालमत्तेची विक्री करू शकता. यासाठी केवळ तुमच्याकडे बक्षीसपत्र करारची प्रत असणे आवश्यक आहे. तसेच, अशा मालमत्तेवर कोणतेही थकीत कर अथवा कर्ज नसावे.