मोबाइल उद्योगातही मंदी (Recession)आल्याचं दिसून येतंय. मागच्या 6 महिन्यांपासून विक्रीमध्ये (Sales) सातत्यानं घट होतेय. जानेवारी ते एप्रिल दरम्यान वार्षिक आधारावर त्यांचं उत्पादन 20 टक्क्यांनी कमी केलंय, असं या क्षेत्रातल्या लोकांचं मत आहे. काउंटरपॉइंटनंदेखील एक अहवाह दिलाय. या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या कालावधीत 30 टक्के आणि जानेवारी-मार्च 2023मध्ये 18 टक्के घट झाली होती. सर्वच मोबाइल कंपन्यांची हीच स्थिती होती. रिलायन्स (Reliance) ही भारतातली सर्वात मोठी मोबाइल फोन रिटेलर कंपनी आहे. मात्र जानेवारी-मार्च या तिमाहीच्या दरम्यान डिव्हायसेस किंवा मोबाइल फोनच्या विक्रीत घट झाल्याचं रिलायन्सनं म्हटलं आहे.
Table of contents [Show]
जगभरातली स्थिती
भारतातच नाही तर जगभरात मोबाइल फोन उद्योगावर परिणाम जाणवत आहे. मागणीमुळे हा परिणाम झाल्याचं जैना समुहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप जैन यांनी सांगितलं. मागणी कमी झाल्यामुळे या मागणीच्या परिस्थितीनुसार कंपन्यांनी आपल्या मोबाइल उत्पादनात कपात केलीय. हा दबाव आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय. तर कंपन्यांनी आपल्या मोबाइल उत्पादनात 15-20 टक्क्यांनी कपात केलीय. यामध्ये प्रामुख्यानं एन्ट्री लेव्हल आणि मिड टियर फोनचा समावेश आहे, असं काउंटरपॉइंटचे रिसर्च डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितल. दुसरीकडे, प्रीमियम सेगमेंटमध्ये अजूनही खरेदी दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं.
उत्तरार्धात होऊ शकते सुधारणा
सध्या बहुतांश ब्रॅण्डकडे विक्री न झालेली दहा आठवड्यांची इन्व्हेंटरी आहे. कमी उत्पादन एप्रिल-जून तिमाहीपर्यंत चालू राहणार आहे. कॅलेंडर वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत थोडी सुधारणा होऊ शकते, असं पाठक म्हणाले. कॅलेंडर वर्षात उत्पादनात अशाप्रकारची कपात पहिल्यांदाच झाल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित उद्योगांनी मागच्या वर्षी एप्रिल-जुलै या तिमाहीमध्ये आणि दिवाळीनंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा अशाचप्रकारची उत्पादन कपात केली होती. मात्र ही कपात सध्याच्या पातळीपेक्षा 5-10 टक्क्यांनी कमी होती, असं यातल्या जाणकार, तज्ज्ञांचं मत आहे.
मागणीत तेजी नाही
यासंबंधी डिक्सन टेक्नॉलॉजीजचे मॅनेजिंग डायरेक्टर अतुल बी. लाल यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते सांगतात, की मोबाइल फोनच्या मागणीत कोणतीही तेजी दिसून येत नाही. मात्र काही कंपन्या भारतातून हँडसेटची निर्यातही करत असल्यानं आतापर्यंत कोणतीही लक्षणीय घट झालेली नाही.
चायनीच स्मार्टफोन उद्योगाची काय स्थिती?
चीनमधला स्मार्टफोन उद्योगदेखील सध्या कठीण अवस्थेतून जात असल्याचं दिसतंय. जागतिक पुरवठा साखळीतला व्यत्यय त्याचप्रमाणं ग्राहक खर्चामुळे पुढल्या वर्षीपर्यंत (2024) यामध्ये वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. इंडस्ट्री रिसर्च फर्म आयडीसीच्या (IDC) अंदाजानुसार, चीनमधली एकूण स्मार्टफोन शिपमेंट 2022मध्ये 10 टक्क्यांनी कमी होऊन 285 दशलक्ष युनिट्सवर आल्याचं स्पष्ट झालंय.
एकूण जागतिक स्थिती
जागतिक स्मार्टफोन बाजाराचा विचार केल्यास मागच्या काही तिमाहीत उद्योगानं घसरणच अनुभवली. 2023च्या Q1मध्ये वार्षिक 12 टक्क्यांची घसरण झाली. कारण बाजार अद्याप सावरलेला नाही. तिमाही-दर-तिमाही रिकव्हरी मिळवणारा सॅमसंग 22 टक्के मार्केट शेअरसह पहिल्या क्रमांकावर होता. तर अॅपलची 21 टक्क्यांवर घसरण झाली. यात शाओमी 11 टक्के, ओप्पो, व्हिवो (आशिया पॅसिफिक प्रदेशात आणि त्यांच्या घरच्या बाजारपेठांमध्ये) अनुक्रमे 10 आणि 8 टक्क्यांवर राहिले.