Car Price Hike: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक काल (11 जुलै) झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. SUV आणि MUV गाड्यांवरील 2 टक्के सेस कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांच्या किंमती 2 टक्क्यांनी महागणार आहेत. हा सेस पूर्वी 20% होता. आता तो वाढून 22% करण्यात आला आहे. देशात SUV आणि MUV गाड्यांची विक्री मागील काही वर्षांत वाढत असताना करवाढीचा धक्का सरकारने दिला आहे.
कोणत्या गाड्यांवरील कर वाढणार
मोठ्या आकाराच्या पेट्रोल किंवा डिझेल SUV (स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल) आणि MUV (मल्टी युटिलिटी व्हेइकल) गाड्यांवरील सेस वाढला आहे. मात्र, तीनपैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या गाडीवर 22% सेस आकारला जाईल.
गाडीमध्ये प्रवासी बसलेले नसताना ग्राऊंड क्लिअरन्स 170mm असेल तर
गाडीची लांबी 4 मीटर पेक्षा जास्त असेल तर
इंजिनची क्षमता 1500cc पेक्षा जास्त असेल तर
अशा गाड्यांवर 22% हा सर्वाधिक सेस आकारला जाईल. याआधी ज्या मोठ्या एसयुव्ही गाड्यांवर 20% सेस आकारला जाई त्यांच्यावर 22% सेस आकाराला जाईल.
दरम्यान, विविध कंपन्यांच्या कोणत्या मॉडेल्सच्या किंमती वाढतील ते अद्याप स्पष्ट झाले नाही. कारण, एखादी गाडी बाजारात येण्याआधी ऑटो कंपनी सरकारला गाडीच्या स्पेसिफिकेशनबद्दल माहिती देत असते. त्या आधारावर सरकार ऑटो कंपनीला Homologation प्रमाणपत्र देते. या प्रमाणपत्रावरील गाडीच्या स्पेसिफिकेशननुसार कर आकारला जातो. त्यामुळे येत्या काळात कोणत्या मॉडेलच्या किंमती वाढतील, हे समजेल.
SUV गाड्यांची वाढती क्रेझ
भारतामध्ये एसयुव्ही क्रेझ मागील काही वर्षात वाढली आहे. इतर कोणत्याही मॉडेलपेक्षा SUV गाड्यांनी ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात साडेतीन लाखांपेक्षा जास्त युटिलिटी व्हेइकल ऑटो कंपन्यांनी डिलर्सला दिल्या. एकूण प्रवासी गाड्यांपैकी 54.61 SUV श्रेणीतील गाड्यांची विक्री बाजारात होत आहे.