मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस कंपन्यांनी गॅसच्या सिलेंडरमध्ये वाढ करून मार्च महिन्यातील गर्मीत आणखी वाढ केल्याचे दिसून येते. गॅस कंपन्यांनी घरगुती गॅस बाटल्याच्या किमतीत 50 तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 350 रुपयांनी वाढ केली. जुलै, 2022 पासून घरगुती गॅसच्या किमती स्थिर होत्या. त्यात सरकारने आजपासून 50 रुपयांनी वाढ केली.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 14.2 किलो ग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1052.50 रुपये होती. त्यात 50 रुपयांची वाढ केल्याने तो आता 1102.50 रुपयांना मिळणार आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी मुंबईत 2071.50 रुपये मोजावे लागणार आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी 1103 रुपये तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 2119.50 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी यापूर्वी 1769 रुपये घेतले जात होते. कोलकातामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी 1079 रुपयांवरून 1129 रुपये, चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांवरून 1118.50 रुपये द्यावे लागणार आहेत. तर याच शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी अनुक्रमे 1870 रुपयांऐवजी 2221.50 रुपये आणि 1917 रुपयांऐवजी 2268 रुपये मोजावे लागणार आहेत. या वाढलेल्या किमती आजपासून (दि. 1 मार्च 2023) लागू झाल्या आहेत.
राज्यातील विविध शहरातील गॅस सिलेंडरचे नवीन आणि जुने दर | ||
शहर | मार्च 2023 (नवीन दर) | फेब्रुवारी 2023 (जुने दर) |
मुंबई | 1102.50 | 1052.50 |
पुणे | 1106 | 1056 |
नाशिक | 1106.50 | 1056.50 |
कोल्हापूर | 1105.50 | 1055.50 |
रत्नागिरी | 1117.50 | 1067.50 |
जळगाव | 1108.50 | 1058.50 |
औरंगाबाद | 1111.50 | 1061.50 |
अमरावती | 1136.50 | 1086.50 |
नागपूर | 1154.50 | 1104.50 |
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेऊन त्यात बदल केले जातात. गॅस कंपन्या याबाबत विविध घटनांचा आढावा घेत निर्णय जाहीर करत असते. मागच्या महिन्यात गॅसच्या किमतीत कोणतेच बदल करण्यात आले नव्हते. पण यावेळी ऐन गर्मीच्या काळात सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 50 रुपयांनी वाढ केली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य अगोदरच बेजार झाले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे.