Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cryptocurrency Scam: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय? स्कॅमर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Cryptocurrency Scam

Image Source : https://www.freepik.com/

बरेचजण कमी कालावधीत जास्तीत जास्त फायदा मिळावा, या उद्देशाने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीला पसंती देतात. मात्र, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना स्कॅमर्सपासून सावध राहणे गरजेचे आहे.

प्रश्न – मी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. यात गुंतवणूक करताना स्कॅमर्सपासून कसे सावध राहावे, याविषयी मार्गदर्शन करावे.

महामनीचे उत्तर – काही महिन्यांपूर्वी जास्त परतावा मिळावा यासाठी अनेकजण क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत होते. मात्र, आता जसजसे या आभासी चलनाचे खरे स्वरूप लोकांसमोर येत आहे, तशी याची लोकप्रियता देखील कमी झाल्याचे पाहायला मिळतेय. खासकरून, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कंपनी असलेल्या FTX आणि OneCoin दिवाळीखोरी गेल्यानंतर यातील जोखीम अनेकांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे भारतात क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता नाही. मात्र, बरेचजण कमी कालावधीत जास्तीत जास्त फायदा मिळावा, या उद्देशाने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीला पसंती देतात. याचाच फायदा स्कॅमर्सद्वारे घेतला जातो. भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

FTX दिवाळखोरीत

Binance, Kraken, Zengo Wallet, PrimeXBT सारख्या कंपन्या क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे. यापैकीच एक कंपनी एफटीएक्स आहे. या कंपनीची स्थापना सॅम बँकमन फ्राइड या व्यक्तीने केली होती. सॅमला ‘किंग ऑफ क्रिप्टो’ म्हणून देखील ओळखले जात असे. मात्र, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजपैकी एक असलेली FTX कंपनी दिवाळखोर झाली असून, गुंतवणुकदारांचे तब्बल 8 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ‘किंग ऑफ क्रिप्टो’ला यासाठी अटक पण झाली. अशाचप्रकारे onecoin या फसव्या क्रिप्टोकरन्सी योजनेंतर्गत गुंतवणुकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. 

भारतातील स्थिती

भारतात क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारावर कोणतीही बंदी नसली तरीही अधिकृत मान्यता देखील नाही. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही. याचाच अर्थ स्वतःच्या जोखमीवर यामध्ये गुंतवणूक करावी लागते.

केंद्रीय अर्थमंत्री यांनी 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये क्रिप्टोच्या व्यवहारावर 30 टक्के कर आकारला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी अर्थ मंत्रालयाने एक नॉटिफिकेशन जारी करत क्रिप्टोकरन्सीशी संबंधित आर्थिक व्यवहार हे मनी लाँड्रिंगच्या अंतर्गत येतील असे म्हटले आहे. म्हणजेच, भारतात क्रिप्टोकरन्सीच्या परवानगीला कोणतीही कायदेशीर परवानगी नाही. आरबीआयने देखील यावर बंदी घालावी असे म्हटले आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना स्कॅमर्सपासून असे राहा सावध –

भारतात क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म Binance, CoinDCX, Zebpay, WazirX यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. तुम्ही देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्कॅमर्सपासून सावध राहणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

बनावट वेबसाइट व अ‍ॅपपासून सावधान - अनेकदा स्कॅमर्सकडून क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची बनावट वेबसाइट बनवली जाते. अशा बनावट वेबसाइटच्या यूआरएलमध्ये मूळ वेबसाइटच्या तुलनेत अगदी छोटासा बदल असतो, जो त्वरित लक्षात येत नाही. स्कॅमर्स अशा बनावट वेबसाइटच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगतात. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना अशा साइटविषयी संपूर्ण माहिती घ्यावी.

परताव्याचे आमिष – इतर गुंतवणुकीच्या तुलनेत क्रिप्टोमधून अधिक परतावा मिळेल, काही महिन्यातच पैसे दुप्पट होतील, असे आमिष दाखवले जाते. अनेकजण क्रिप्टोबाबत जास्त माहिती नसल्याने इतर व्यक्ती, कन्सल्टन्सीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. मात्र, अनेक घटनांमध्ये अशा व्यक्ती सामान्य लोकांनी गुंतवणूक केलेले पैसे घेऊन फरार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तामिळनाडूमध्ये अशाच प्रकारे 100 कोटींचा, तर जालन्यात देखील कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. 

पंप अँड डंप स्कॅम – या स्कॅममध्ये काही लोक एकत्र येऊन विशिष्ट कॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात.  सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा कॉइनची लोकप्रियता वाढवतात व इतरांनी या गुंतवणूक केल्यास अचानक सर्व पैसे काढून घेतात. त्यामुळे तुम्ही नक्की कशात गुंतवणूक करत आहात, त्याची खात्री करा. 

क्रिप्टो वॉलेट ठेवा सुरक्षित – क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीसाठी आलेला अनोळखी मेल, एसएमएस यापासून सावध राहा. तसेच, क्रिप्टो वॉलेट सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. याबाबत कोणालाच माहिती देऊ नये. तसेच, क्रिप्टो वॉलेटला डबल ऑथिंटिकेशनने सुरक्षित ठेवावे. महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारची गुंतवणूक टप्प्या टप्प्याने करावी. जेवढी जोखीम स्विकारू शकता तेवढी गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे ठरते.