तुम्ही जर येणाऱ्या काही दिवसांत फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात. पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून तुम्ही ट्रॅव्हल नाऊ, पे लेटर (Travel Now Pay Later-TNPL) स्कीमचा वापर करत आहात. तर थोडे सावध राहा. तसे ट्रॅव्हल नाऊ पे लेटर हे, बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later-BNPL) सारखीच एक स्कीम आहे. जी तुम्हाला अगोदर फिरण्याची मजा देते आणि त्यानंतर त्याचे पैसे भरण्याची सुविधा देते. तशी ही स्कीम वरवर चांगली आणि परवडणारी वाटते. पण इथेच नेमका घोळ होतो. तो कसा होतो, हे आपण समजून घेणार आहोत.
ट्रॅव्हल नाऊ पे लेटर स्कीमद्वारे तु्म्ही एकदम ठराविक रक्कम भरण्यास असमर्थ असाल तर तुम्हाला ही स्कीम टप्प्याटप्प्याने मासिक हप्त्याच्या रूपाने पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देते. ही स्कीम बहुतांश टूर आयोजित करणाऱ्या अॅग्रीगेटर्सकडून जसे की, मेक माय ट्रीप एस माय ट्रिप (MakeMyTrip & EaseMyTrip)आणली जाते. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या स्कीम असतात. कोणी झिरो पर्सन्ट इंटरेस्टने आर्थिक मदत करतात. तर काही जण ठराविक मुदतीसाठी किमान व्याजदर आकारून पैसे देतात. पण आपण जेव्हा हप्त्याने सर्व पैसे फेडतो. तेव्हा आपण नकळतपणे त्यावर 18 ते 25 टक्क्यांपर्यंत इंटरेस्ट पेड केलेला असतो. त्यामुळे अशा स्कीम स्वीकारण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्यायला हवी. कारण आपण ईएमआय स्वरूपात जेवढी रक्कम भरतो. ती मार्केट रेट पेक्षा खूप जास्त असल्याचे आपल्या नंतर लक्षात येते.
ट्रॅव्हल नाऊ पे लेटर हे एक प्रकारचे शॉर्ट टर्म कर्ज आहे. अशा पद्धतीने पैसे उसने घेऊन फिरायला जाणे कितपत योग्य आहे, याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. कारण कर्ज ही आपल्यासाठी सुविधाच आहे. पण त्याचा वापर आपण कशासाठी करतो. हे पाहणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. घर, गाडी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी कर्ज काढणे हे अपरिहार्य आहे. यातून आपल्याला भविष्यात् काहीतरी फायदा अपेक्षित असतो. पण ट्रॅव्हल नाऊ पे लेटर मध्ये फक्त काही क्षणांच्या आनंदासाठी कर्ज काढणे हे परवडणारे नाही.
TNPL घेण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा
- पैसे साठवून काही दिवसांनी किंवा महिन्यांनी फिरायला जाणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही Travel Now Pay Later चा पर्याय टाळावा.
- Travel Now Pay Laterचे हप्ते वेळेवर भरले नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोअर विपरित परिणाम होऊ शकतो.
- Travel Now Pay Later सुविधेमधून हप्त्याने पैसे भरायचे असले तरी जास्त दराने पैसे भरण्याची तुमची तयारी आहे का? याचा विचार करा.
- तुमचे होम लोन, कार लोन किंवा इतर कुठल्याही प्रकारचे ईएमआय सुरू असतील तर TNPLचे आणखी ईएमआय वाढवू नका.