सध्या देशात लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. लग्नासाठी खरेदी इतर तयारी, पाहुण्यांचे मानपान करताना यजमानांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच हल्ली घरी किंवा शहरात लग्न करण्याऐवजी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी मोजक्याच पाहुण्यांसह लग्नाचा बार उडवून देण्याचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे.
डेस्टिनेशन वेडिंग मुळातच महागडी संकल्पना असली तरी जरा हटके लग्न करणाऱ्यांकडून पैशांबाबत फारसा विचार केला जात नाही. आपल्या मनाजोगे थाटामाटात लग्नाचा सोहळा करण्यासाठी शहरांपासून दूर आडवाटेवरच्या रिसॉर्टमध्ये, पर्यटन स्थळांना डेस्टिनेशन वेडिंगासाठी पसंती दिली जाते.
डेस्टिनेशन वेडिंगमध्ये वेडिंग प्लॅनरची महत्वाची भूमिका बजावतो. डेस्टिनेशन वेडिंगसाठी होणारा खर्च आणि त्याचे नियोजन वेडिंग प्लॅनर करतो. वेडिंग प्लॅनर नसल्यास काही महत्वाच्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचे बजेट तयार करु शकता.
1) तुमचे बजेट फायनल करा
पैशांचे सोंग आणता येत नाही असे बोलतात. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगचे तुम्ही नक्की केले असेल तर बजेटबाबत काटेकोर असणे आवश्यक आहे. तुमच्या स्वप्नातील विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी तुम्ही कितपत खर्च करु शकता हे तुम्हाला ठरवावे लागेल.
2) कोणत्या गोष्टीला किती पैसे खर्च करणार
डेस्टिनेशन वेडिंगसाठी ठिकाण निश्चित करणे सर्वात महत्वाचे आहे. हॉटेल किंवा रिसॉर्ट बुक करणार असाल त्याचे अॅडव्हान्स बुकिंग करणे आवश्यक आहे. याशिवाय त्याठिकाणी येण्याजाण्याचा खर्च, प्रवास कसा करणार बस, ट्रेन किंवा फ्लाईट याचे बजेट आखणे आवश्यक आहे.
3) गेस्ट लिस्ट फायनल करा
डेस्टिनेशन वेडिंगसाठी जे काही मोजकेच पाहुणे येणार असतील त्यांची यादी फायनल करा. तुम्ही तिथे किती दिवस मुक्काम करणार आहेत. त्या ठिकाणी कोण कोणते कार्यक्रम होणार आहेत त्यानुसार तुम्हाला पाहुण्यांची यादी करता येईल. हॉटेल किंवा रिसॉर्टकडून काय काय अॅमेनिटीज दिल्या जातात यानुसार तुम्हाला बजेट फायनल करता येईल.
4) प्रोफेशनल्स लोकांना कन्फर्म करा
डेस्टिनेशन वेडिंगमध्ये मेकअप आर्टिस्ट, व्हिडिओ आणि फोटोग्राफर, टॅक्सी सर्व्हिसेस, बेंजो, घोडीवाले यांना किमान दोन ते तीन महिने आधीच बुक करुन ठेवा. त्यांच्याकडून वेळोवेळी कन्फर्मेशन घ्या. ऐनवेळी प्रोफेशनल लोकांना विचारले तर पैसे देखील जादा द्यावे लागतात.
5) वेळेत आमंत्रणे पाठवा
डेस्टिनेशन वेडिंगमध्ये नियोजन करताना खूपच गोंधळ होतो. या गडबडीत लग्नाची आमंत्रणे पाठवण्यात अनेकदा उशीर होतो. लग्न सोहळा बाहेर होणार असल्याने शक्यतो वेळेत नातेवाईकांना आणि पाहुण्यांना आमंत्रण पत्रिका वेळेत पाठवली तर त्यांनाही लग्नाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे शक्य होईल.