देशात यूपीएससी आणि राज्य पातळीवरील लोकसेवा आयोगाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता एड्युटेक स्टार्टअप्स म्हणून नावारुपाला आलेल्या 'फिजिक्सवाला'ने (Physics Wallah) आता या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीएससीशीसंबधित कंटेट तयार करुन तो विविध भाषांमध्ये वितरित करण्याचे नियोजन 'फिजिक्सवाला'ने केले आहे. यासाठी 100 कोटींची गुंतवणूक केली जाणार असून लवकरच दिल्लीत पहिले कोचिंग सेंटर सुरु होणार आहे.
'फिजिक्सवाला'ने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात कोचिंग सेंटर्स सुरु करण्याचे ठरवले आहे.यूपीएससी अभ्यासक्रमासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा 'फिजिक्सवाला'ने 'PWOnlyIAS' हा खास विभाग सुरु करणार आहे. यूपीएससी वालाह साठी कंपनीकडून 100 कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीचे संस्थापक अलख पांडे यांनी सांगितले.
यूपीएससी कोचिंग सेंटर बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात सुरु केली जाणार आहेत.जयपूर, अलाहाबाद, पटना, लखनऊ, इंदोर, पुणे या शहरांत 'फिजिक्सवाला'यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग सेंटर सुरु करणार आहे. वर्ष 2023 पर्यंत 3 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा 'फिजिक्सवाला'चा प्लॅन आहे.
इंजनिअरिंग, मेडिकल आणि यूपीएससीसाठी परिक्षापूर्व कोचिंग देणाऱ्या 'फिजिक्सवाला'ची स्थापना 2020 मध्ये अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी यांनी केली होती. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारांमध्ये कोचिंग सुरु आहे. नुकताच 'फिजिक्सवाला'ने विद्यापीठ स्कुल या कोचिंग सेक्शनसाठी 82 कोटींची गुंतवणूक केली होती.
यापूर्वी 'फिजिक्सवाला'केवळ JEE आणि NEET या दोन परिक्षांसाठी कोचिंग देण्यात येत होती. आता यूपीएससी आणि राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम सुरु केल्याने येत्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास अलख पांडे यांनी व्यक्त केला. सध्या 'फिजिक्सवाला' हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी आणि तेलगु या भाषेत कंटेट देत आहे. 'फिजिक्सवाला'चे 2 कोटी 30 लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत. 
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            