जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे देशांतर्गत इंधन दरात कपात करण्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सूतोवाच केले आहेत. लवकरच पेट्रोलियम कंपन्यांसोबत बैठक होणार असून यात पेट्रोल आणि डिझेल दर कपातीबाबत विचार केला जाईल, असे पुरी यांनी सांगितले.
देशात मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलचा दर जैसे थेच आहे. वास्तविक पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले जातात. इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने कंपन्यांकडून दररोज आढावा घेतला जातो. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतींचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जातो.
मे 2022 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत. वर्षभरात जागतिक बाजारात क्रूडच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती, मात्र त्याचा फायदा भारतीयांना झाला नाही. कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी आहे.
विरोधी पक्षांनी देखील इंधनाच्या किंमतींबाबत सरकारवर टीका केली होती. घरगुती सिलिंडरच्या महागाईवरुन सरकारला लक्ष्य करण्यात आले होते. त्यासंदर्भात आज पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्लीत भाजप मुख्यालयाक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की जर नजीकच्या काळात क्रूडच्या किंमती स्थिर राहिल्या तर इंधन दर कमी करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
लवकरच पेट्रोलियम कंपन्यांसोबत बैठक होणार असून त्यावेळी इंधन दर कपातीच्या मुद्यावर चर्चा केली जाईल, असे पुरी यांनी सांगितले. गेल्या तिमाहीत सरकारी तेल वितरक कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी नुकसानीची बऱ्यापैकी भरपाई केली आहे.
केंद्र सरकारच्या काळात एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांवर महागाई भार कमी करावा म्हणून सरकारने इंधनावरील शुल्क कपात केली होती. मात्र बिगरभाजप शासित राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी न केल्याने आजही तेथे पेट्रोल आणि डिझेल महाग असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार देशांतर्गत तेल शुद्धीकरणाची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या भारताची रिफायनरिंग क्षमता 252 मिलियन मेट्रिक टन इतकी आहे. ती वाढवून 400 ते 500 मिलियन मेट्रिक टन इतकी केली जाईल, असे पुरी यांनी सांगितले. यासाठी ऑईल अॅंड नॅचरल गॅस क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली जाईल, असे पुरी यांनी सांगितले.