अनेकदा गाडीच्या टाकीत पेट्रोल भरून बराच वेळ कार वापरली जात नाही, असे दिसून येते. पण पेट्रोललाही एक्स्पायरी डेट असते, हे अनेकांना माहीत नसते. टाकीमध्ये भरलेले पेट्रोल वेळेत वापरले नाही तर त्यामुळे इंजिनचेही नुकसान होऊ शकते.
पेट्रोललाही असते एक्सपायरी डेट
पेट्रोलची एक्स्पायरी डेटही असते हे सामान्यपणे माहिती नसते. पेट्रोल भरल्यानंतर गाडीचा वापर होतोच, पण काही वेळा गाडी तशीच दीर्घ कालावधीपर्यंत पडून राहते. पेट्रोलमधील रासायनिक क्रिया झाल्याने अशा परिस्थितीत गाडीच्या टाकीत भरलेले पेट्रोल काही वेळाने खराब होऊ लागते.
तज्ज्ञांच्या मते सीलबंद कंटेनरमध्ये पेट्रोल एक वर्षासाठी साठवता येते. कारमध्ये एकदा पेट्रोल भरले की ते 20 अंश तापमानात सहा महिने ठेवता येते आणि जर तापमान 30 अंश असेल तर त्याचे आयुष्य सुमारे तीन महिने इतके असते. दुसरीकडे यापेक्षा जास्त तापमान असताना पेट्रोलचे आयुष्य आणखीनच कमी होते.
पेट्रोलमध्ये अनेक प्रकारचे इंधन मिसळले जाते. त्यात इथेनॉलसह अनेक प्रकारची रसायने असतात. पेट्रोल भरल्यानंतर बराच वेळ गाडी वापरली नाही तर रोजच्या तापमानात होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलपासून तयार होणारी वाफ टाकीतून बाहेर पडत नाही. जेव्हा असे होते तेव्हा इथेनॉल वाफ शोषण्यास सुरवात करते, ज्यामुळे पेट्रोल खराब होते.
गाडीत भरलेले पेट्रोल जास्त वेळ वापरले नाही तर ते खराब होते. ज्यानंतर कारच्या इंजिनचा वापर केल्यावर सर्वाधिक नुकसान होते. जेव्हा असे पेट्रोल वापरले जाते तेव्हा ते प्रथम इंधन पंपावर पोहोचते, त्यामुळे पंप जाम होण्याचा धोका असतो. इंधन पंपानंतर कार्बोरेटरवर देखील वाईट परिणाम होतो. इंधन पंप आणि कार्ब्युरेटर व्यतिरिक्त, जेव्हा पेट्रोल इंजिनमध्ये प्रवेश करते तेव्हा त्याचा इंजिनवर देखील वाईट परिणाम होतो.