Cost Comparison Of Petrol and Electric Car : कार घ्यायची म्हटली की ती पेट्रोल कार घ्यावी की इलेक्ट्रिक कार असा प्रश्न उपस्थित होतो. हा निर्णय घेताना ऑन रोड प्राईसचा विचार करावा की ती कार चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करावा, हाही प्रश्न त्याला जोडून येतो. या लेखात petrol car vs electric car यांच्या केवळ ऑन रोडच नव्हे तर पुढील 6 वर्षाच्या खर्चाचे गणित मांडून आपण कोणती कार फायदेशीर ठरू शकते याची चर्चा करणार आहोत.
यासाठी आपण Tata Nexon (XZA plus) ही पेट्रोल कार आणि Tata Nexon Prime (XZ Plus) या इलेक्ट्रिक कारची तुलना करू. यातल्या टाटाच्या पेट्रोल कारची 11 लाख 4 हजार 900 इतकी तर इलेक्ट्रिक कारची 16 लाख 30 हजार इतकी शोरुम प्राइज आहे. पेट्रोल कारवरील इन्शुरन्सचा खर्च 54 हजार 686 इतका तर इलेक्ट्रिक कारवर तर तो 72 हजार 324 इतका आहे. रजिस्ट्रेशन आणि हॅंडलिंग चार्जचा विचार केला तर पेट्रोल कारसाठी तो 1 लाख 18 हजार 990 इतका तर इलेक्ट्रिक कारसाठी 16 हजार 500 इतका म्हणजे पेट्रोल कारच्या तुलनेत खूपच कमी आहे. पण अशी सगळी बेरीज करून एकूण खरेदीची किमत बघितली तर पेट्रोल कारमध्ये साधारण साडेचार लाख रुपये वाचतात असे दिसून येईल. कारण पेट्रोल कारची 12 लाख 78 हजार 576 रुपये इतकी तर इलेक्ट्रिक कारची 17 लाख 18 हजार 824 इतकी ऑन रोड प्राइज होते.
Petrol car vs Electric car यामधला हा फरक बघून पेट्रोल कारच अधिक फायदेशीर असे चटकन वाटून जाऊ शकते. पण आता गाडी घेतल्यानंतर 6 वर्षापर्यंतच्या खर्चाचा विचार करून बघू. हे करत असताना कार 6 वर्षात 1 लाख किलोमीटर इतकी धावली, असे गृहीत धरू.
याप्रमाणे पेट्रोल कारची सर्व्हिस कॉस्ट 50 हजार तर इलेक्ट्रिक कारसाठी 6 वर्षात साधारणपणे 30 हजार इतका खर्च होतो. 1 किमी इतक्या अंतरामागे पेट्रोल कारसाठी 6 रुपये 92 पैसे तर इलेक्ट्रिक कारसाठी केवळ 68 पैसे म्हणजे एक रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. याच हिशेबाने 1 लाख किमी प्रवास केल्यावर 7 लाख 42 हजार 857 रुपये इतका खर्च पेट्रोल कारसाठी तर 98 हजार 181 रुपये इतका इलेक्ट्रिक कारसाठी साधारणपणे खर्च होतो. इन्शुरन्सचा दुसऱ्या ते सहाव्या वर्षाचा खर्च एकत्र केला तर पेट्रोल कारसाठी तो 43 हजार तर इलेक्ट्रिक कारसाठी 55 हजार रुपये इतका होतो.
कार खरेदी करण्यापासून ते पुढील 6 वर्षापर्यंत असा एकूण पेट्रोल कारसाठी 20 लाख 64 हजार 433 रुपये तर इलेक्ट्रिक कारसाठी 18 लाख 72 हजार 605 रुपये इतका खर्च होतो. म्हणजे सहाव्या वर्षापासून इलेक्ट्रिक कार ही फायदेशीर ठरू शकते असा अर्थ यातून काढता येऊ शकतो. पण, काही गृहीतकांवर आधारित ही माहिती आहे. हा निर्णय घेताना याचबरोबर आणखीही काही मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे. यामुळे Petrol Car vs Electric Car यापैकी तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने काय योग्य आहे, ते ठरवणे सोपे होईल.
कारचा वापर किती आहे?
इथे 6 वर्ष आणि 1 लाख किमीवर आधारित हिशेब करताना कार रोज सरासरी 46 किमी इतकी फिरेल असे गृहीत धरले आहे. तुमचा कारचा वापर किती आहे हा मुद्दा देखील कार खरेदी करताना महत्वाचा ठरतो. कारण इंधनावरील खर्चाचा विचार केला तर इलेक्ट्रिक कार पेट्रोल कारच्या तुलनेत फायदेशीर ठरते.
एकरकमी कार घेणार असाल तर ...
तुम्ही कार एकदाच पैसे देऊन घेणार असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक कारसाठी साधारणपणे साडेचार लाख रुपये अधिक द्यावे लागतील. हेच पैसे एफडी केले तर मध्यम कालावधीत दीड ते पावणे दोन लाख रुपये इतके व्याज मिळू शकते. कर्ज काढून कार घेताना इलेक्ट्रीक कारवर आयकर सूट देखील असते. आर्थिक दृष्टीने Petrol vs Electric Car यात काय योग्य याचा विचार करताना हे मुद्देदेखील देखील महत्वाचे ठरतात.
पेट्रोलच्या किमतीत वेगाने होणारी वाढ
इलेक्ट्रिक कार फायदेशीर ठरण्याच एक मुख्य कारण म्हणजे इंधनावारील खर्च. पेट्रोलच्या किमती वेगाने वाढत आहेत. यामुळे ग्राहकावर दोन कारमधील खर्चाचा भार वाढत आहे.
थोडक्यात, तुम्हाला कोणत्या दोन कार मॉडेलमध्ये निर्णय घ्यायचा आहे, पेमेंट कशा प्रकारे करणार आहात, कारचा वापर किती आहे, अशा मुद्यांचा सारासार विचार करून आर्थिक दृष्टीने काय फायदेशीर ते ठरवता येईल. याचबरोबर पर्यावरण लाभाच्या दृष्टीने काय अधिक योग्य आहे, हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. ही तुलना केवळ आर्थिक दृष्टीने केलेली आहे, हेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे.