Emergency Fund: आपत्कालीन निधीचे महत्त्व कोरोना काळात आपण सर्वांनी पाहिलेले आहे. संकटकाळी उपयोगात येणारा हा निधी खूपच महत्त्वाचा आहे. या निधीतून किमान 6 महिन्यांचा अत्यावश्यक खर्च भागणे अपेक्षित असते. काही खर्च असे असतात की, तुम्ही ते टाळू शकत नाही. अशावेळी नेहमीचा आर्थिक स्त्रोत बंद झाल्यावर आपत्कालीन निधीचा मोठा आधार ठरत असतो. पण आपत्कालीन निधी तुम्ही कशाप्रकारे उभा करता. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तर आज आपण आपत्कालीन निधी कसा? किती आणि कशाप्रकारे जमा केला पाहिजे हे पाहणार आहोत.
Table of contents [Show]
पगारातील किती रक्कम आपत्कालीन निधीसाठी बाजुला काढावी?
आपत्कालीन निधी म्हणजे आपल्या अडचणीच्या काळात उपयोगी येणारा निधी असतो. हा निधी तयार करणे याची सुद्धा एक पद्धत आहे. अन्यथा तुम्ही तुमच्या खर्चातून काही भाग फक्त बाजुला काढून तो वाढणार नाही किंवा त्यात हवी तशी वाढही होणार नाही. यासाठी आपत्कालीन निधी तयार करताना त्याचे काही ठोकताळे पाळावे लागतात. जसे की, पगारातील किती टक्के रक्कम आपत्कालीन निधीसाठी बाजूला काढून ठेवली पाहिजे. तर याचे उत्तर आहे की, पगारातील किमान 10 ते 12 टक्के रक्कम ही आपत्कालीन निधी म्हणून बाजुला काढली पाहिजे. पण एवढे करून तुमचे काम भागणार नाही. यासाठी जो निधी तुम्ही पगारातून बाजुला काढला आहे. तो कुठेतरी गुंतवावा लागेल. जसे की, एखाद्या बॅंकेत किंवा गुंतवणूक योजनेत. जेणेकरून बाजुला काढलेल्या रकमेत काही दिवसांनी वाढ होणे अपेक्षित आहे. मग अशावेळी प्रश्न निर्माण होतो की, आपत्कालीन निधी तयार करताना पैसे कोठे गुंतवले पाहिजेत.
आपत्कालीन निधी कुठे गुंतवला पाहिजे?
आपत्कालीन निधी तयार करताना किंवा त्यासाठी पैसे बाजुला काढताना, ते अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत. जिथून तुम्ही ते सहज तुमच्या गरजेच्यावेळी काढू शकाल. म्हणजेच तुम्हाला पैशांची गरज लागली की, ते तुम्हाला लगेच वापरता आले पाहिजेत. यासाठी रोख रक्कम हा एक पर्याय ठरू शकतो. पण त्याची क्षमता खूपच कमी असू शकते. मोठ्या प्रमाणात आपत्कालीन निधी उभा करायचा असेल किंवा त्यात दिवसेंदिवस वाढ करायची असेल तर त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय वापरले पाहिजेत. जसे की आपत्कालीन निधी बॅंकेत फिक्स डिपॉझिटमध्ये चांगल्या व्याजदराने ठेवू शकता किंवा आपत्कालीन निधीतील अर्धी रक्कम लिक्विड फंडमध्ये गुंतवून त्यावर चक्रव्याढ पद्धतीने व्याजदेखील मिळवू शकता. म्हणजेच पैसे आपत्कालीन निधी म्हणून बाजुला काढून ठेवताना तो टप्प्याटप्प्याने वाढेल याची काळजी घ्यायला हवी. अशा पद्धतीने तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्ही सहज काढूही शकता आणि त्यावर व्याजही मिळते. तसेच त्यावर कोणता दंड ही आकारला जात नाही.
आपत्कालीन निधी सेव्हिंग बॅंक खात्यात ठेवावा का?
आपत्कालीन निधी हा गरजेला वापरता येणारा निधी असतो. त्यामुळे तो सहज काढता येईल, अशा पद्धतीने गुंतवणे गरजेचे आहे. पण तो अगदी सेव्हिंग बॅंक खात्यातही गुंतवू नये, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. कारण आपत्कालीन निधीमधून चांगला परतावा मिळणे अपेक्षित असते.
आपत्कालीन निधी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावा का?
आप्तकालीन निधी म्युच्युअल फंडमध्ये नक्की गुंतवता येऊ शकतो. म्युच्युअल फंडमधील लिक्विड फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड गुंतवू शकतो, असे यातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, आपत्कालीन निधी हा नुसता ठेवू नये. तो कोठेतरी गुंतवला पाहिजे. जेणेकरून त्यातून चांगला परतावा मिळेल.
आपत्कालीन निधी किती असावा?
आपत्कालीन निधी अमुक एका रकमेचा असावा, असे सांगता येत नाही. आपत्कालीन निधी हा प्रत्येकाचे राहणीमाण, दैनंदिन खर्च, भविष्यातील खर्च यावर अवलंबून असतात. म्हणून आर्थिक सल्लागार नेहमी आपत्कालीन निधी तयार करताना, त्यातून तुम्हाला किमान 6 महिन्यांचे खर्च भागवता येतील, इतका निधी असावा, असे सुचवतात. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर असा निधा तयार करताना तुमचे वैयक्तिक वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या, तुमच्यावर किती लोक अवलंबून आहेत. याचा विचार करून तो तयार केला पाहिजे.
आपत्कालीन निधीचे फायदे काय?
ऐनवेळी आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आपण साधारणत: नातेवाईक किंवा आपल्या ओळखीच्या लोकांकडून मदत घेतो. तर काही वेळेस अंगावरील दागिने विकले जातात. फिक्सड् डिपॉझिट मोडतो आणि पैसे उभे करतो. पण आपण जर योग्य नियोजन करून आपला स्वत:चा आपत्कालीन निधी उभा करू शकलो तर आपल्यावर अशी दुसऱ्यांकडे पैसे मागण्याची किंवा बचत केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ येणार नाही. आपत्कालीन निधीमुळे तुम्ही संकटकाळातही निश्चित राहून योग्य मार्ग काढू शकता.
सध्याच्या परिस्थितीत कोणता खर्च अचानक वाढेल हे तुम्ही सांगू शकत नाही. यात मुलांच्या शाळेची फी, होम लोनचा ईएमआय किंवा एखादे मोठे ऑपरेशन असे काहीही असू शकते. अशावेळी आपत्कालीन निधीतून वेळोवेळी काढला जाणारा निधी पुन्हा भरणेही आवश्यक असते.