तुमच्या बॉसला तुमच्यापेक्षा 240 पट जास्त पगार मिळतो हे तुम्हाला माहीत आहे का? प्राईम इन्फोबेस (Prime Infobase) या संस्थेनं केलेल्या एका पाहणीत तसा निष्कर्षच निघाला आहे. यात देशातल्या बहुतेक क्षेत्रांमध्ये कर्मचारी वर्गाचा सरासरी वार्षिक पगार 10 लाख रुपये इतका असल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कोव्हिड पूर्व काळात (Pre Covid Era) पगारातली ही तफावत 214 पट इतकी होती. ती कोव्हिड नंतरच्या काळात उलट वाढलीय.
आणखी एक निरीक्षण म्हणजे 2018-19 मध्ये ही तफावत 191 पट इतकी होती . पण, तिथून पुढे यात वाढच होत आली आहे.
2019 मध्ये उच्च पदस्थ व्यक्तीला भारतीय कंपनीत वार्षिक सरासरी 10 कोटी रुपयांचं पॅकेज मिळत होतं. आणि हेच प्रमाण 2022मध्ये 12.7 कोटी रुपयांवर गेलं आहे. तेच मिड-लेव्हल कर्मचाऱ्याला मिळणारा वार्षिक पगार मात्र 8 लाख रुपये इतका कमीच झाला आहे.
2022मध्ये सर्वाधिक पगार जयपूरच्या AU स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी अधिकारी उत्तम तिबरवाल यांना मिळाला. त्यांचं पॅकेज वार्षिक 121.3 कोटी रुपयांचं होतं. यात कंपनीच्या समभागांच्या रुपाने त्यांना 119 कोटी रुपये मिळत होते. मुंबईतल्या क्रॉम्पटन ग्रीव्ह्ज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू खोसला यांना तिबरवाल यांच्या खालोखाल 119 कोटी रुपये इतका पगार मिळाला. यातले 100 कोटी रुपये त्यांना समभागांच्या रुपात मिळतात.
दिवी लॅब्ज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुरली दिवी यांना 2022 मध्ये 110.4 कोटी रुपये मिळाले. यातले 110 कोटी रुपये कंपनीला झालेल्या नफ्यातला हिस्सा म्हणून त्यांना देऊ करण्यात आला.
याखेरीज क्षेत्रांचा विचार केला तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पगारातली ही दरी आणखी मोठी आहे. तिथे मिड-लेव्हल कर्मचाऱ्यापेक्षा अधिकाऱ्याला मिळणारा पगार 340 पट जास्त आहे. आणि काही कंपन्यांमध्ये तो 380 पट पर्यंत वाढू शकतो. सर्वोच्च व्यवस्थापकीय पदावर असलेल्या व्यक्तीला स्थैर्य असावं आणि त्या व्यक्तीने जबाबदारीने संस्थेचा कारभार करावा यासाठी उच्चपदस्थ व्यक्तींना गलेलठ्ठ पगार दिला जात असल्याचं क्वेस स्टाफिंग कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिवाराम यांनी म्हटलं आहे.
ऊर्जा क्षेत्रातल्या मिड-लेव्हल कर्मचाऱ्याला सरासरी वार्षिक 18 लाख रुपये पगार आहे. तर औद्योगिक उत्पादन क्षेत्रातला पगार 11.09 लाख इतका आहे. वित्त सेवा क्षेत्रातला सरासरी पगार 10.24 लाख इतका आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            