Patanjali New Products: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलि फूड्स लिमिटेडने 14 नवीन प्रोडक्टस् लॉन्च केले आहेत. यातील बरेच प्रोडक्टस् हे स्पोर्ट्स आणि हेल्थशी संबंधित आहेत.
पतंजलि फूड्स लिमिटेडने आणलेल्या प्रोडक्ट्समध्ये न्यूट्रास्यूटिकल्स, हेल्दी बिस्किट्स, न्यूट्रेला मिलेट बेस्ड प्रोडक्टस् त्याचबरोबर स्पोर्ट्सशी संबंधित असलेल्या ग्राहकांसाठी कंपनीने न्यूट्रेला स्पोर्ट्सद्वारे स्पोर्ट्स ड्रिंक आणि व्हिटामीन व मिनरलची मात्रा असलेले सप्लीमेंटसुद्धा मार्केटमध्ये आणले आहेत.
सध्या प्रत्येक जण स्वत:ची लाईफस्टाईल सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिमला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे आणि जे जीमला जातात त्यांच्यामध्ये स्पोर्ट्स न्युट्रिशन प्रोडक्ट्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. इंडियन स्पोर्ट्स न्यूट्रिशन इंडस्ट्री ही 2028 पर्यंत तब्बल 8,000 कोटी रुपयांची होण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडून होत असलेली मागणी आणि इंडस्ट्रीतून मिळत असलेला प्रतिसाद पाहता पतंजलिने न्यूट्रेला स्पोर्ट्स प्रोडक्ट्स लॉन्च केले.
दरम्यान, पतंजलि फूड्स कंपनीनेही 2028 पर्यंत कंपनीचा महसूल 1 लाख कोटीच्यावर नेण्याचा संकल्प सोडला आहे. यासाठी कंपनीकडून वेगवेगळी प्रोडक्ट्स आणली जात आहेत. सध्या कंपनीने आयुर्वेद, हर्बल प्रोडक्ट आणि ग्राहकोपयोगी वस्तुंच्या आधारावर वर्षाला 45 हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत कंपनी नक्कीच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकेल, असा बाबा रामदेव यांना विश्वास आहे.
कंपनीने काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड असा सुका मेवादेखील न्यूट्रेला ब्रॅण्ड अंतर्गत मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या ब्रॅण्डमधून आलेले प्रोडक्ट्स ही उच्च दर्जाची आहेत. याचबरोबर कंपनीने रागी, ग्रेन, नाचणी अशी विविध प्रकारची फायबरयुक्त आणि कॅल्शिअम असलेली बिस्किटे देखील मार्केटमध्ये आणली आहेत.