पंजाब नॅशनल बँकेने वार्षिक उत्पन्न ही मुदत ठेव योजना (FD Scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या योजनेच्या गुंतवणूकदारांना काळजी करण्याची गरज नाही. वार्षिक उत्पन्न योजना बँकेच्या स्पेशल डिपॉझिट योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना ठराविक व्याजदराने वेळेत परतावा मिळत राहील. वार्षिक उत्पन्न योजनेत (PNB Varshik Aay Yojna) दिलेले लाभ खातेदारांना पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील.
खातेदारांना लाभ मिळतील -
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना, गुंतवणूकदारांना याबाबत माहिती दिली की, पीएनबी वार्षिक उत्पन्न योजना रद्द करण्यात आली आहे असून PNB स्पेशल डिपॉझिट योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे. वार्षिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करणार्या खातेदारांच्या खात्यात त्यांना योजनेंतर्गत दिले जाणारे लाभ सुरूच राहतील, असे बँकेने म्हटले आहे. आधीच्या योजनेअंतर्गत खातेदारांना देण्यात येणारे लाभ सुरुच राहतील, असे बँकने म्हटले आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक उत्पन्न योजनेत जमा करता येणारी किमान रक्कम 10 हजार रुपये इतकी आहे. या योजनेचा कालावधी 24, 36, 48, 60, 72, 84, 96, 108 आणि 120 महिन्यांचा होता. आता ते PNB स्पेशल डिपॉझिट योजनेत विलीन करण्यात आली आहे. PNB स्पेशल डिपॉझिट योजना किमान ठेवी 100 रुपयापर्यंत केल्या जाऊ शकतात आणि त्याचा कालावधी तीन महिने, 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत आहे. IRMD, ALM सेलने जारी केलेल्या सूचनांनुसार PNB विशेष ठेव योजनेवरील व्याज दर मासिक असेल.
मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ
पंजाब नॅशनल बँकेने 19 डिसेंबर रोजी मुदत ठेवींवरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, सामान्य नागरिकांना 600 दिवसांसाठी FD मध्ये गुंतवणुकीवर 7 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना (सिनियन सिटिझन) 7.50 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (सुपर सिनियर सिटिझन) 7.80 टक्के रक्कम दिली जात आहे. 666 दिवसांच्या गुंतवणुकीवर, बँकेने सामान्य नागरिकांना सर्वाधिक 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के व्याज देऊ केले आहे.