केंद्र सरकारच्या 'उडान' या महत्वकांक्षी योजनेत समावेश होऊन देखील विमान सेवेपासून वंचित असलेल्या सोलापूर विमानतळापुढील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याची वादग्रस्त चिमणी पाडल्यामुळे सोलापूरसाठी नियमित विमान सेवा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या विमान सेवेमुळे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर येथील तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी गतिमान वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
केवळ राज्यातच नाही तर देशभरातील भाविकांमध्ये श्रद्धास्थान असलेल्या पंढपुरात सध्या आषाढी वारी अंतिम टप्यात आहे. पंढरपूर रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. सोलापूर विमानतळ हे पंढरपूरसाठी जवळचे एअरपोर्ट आहे. मात्र श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या 92 मीटर उंच चिमणीमुळे विमान सेवेत अडथळा निर्माण झाला होता. फ्लाईंग झोनमध्ये चिमणी आल्याने विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती. यामुळे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी विमान सेवा उपलब्ध नव्हती.
वर्ष 2009-10 मध्ये सोलापूरमध्ये विमान सेवा सुरु करण्यात आली होती. किंगफिशर एअरलाईन्सकडून सोलापूरसाठी विमान सेवा सुरु होती. मात्र 2010 मध्ये किंगफिशर कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यानंतर विमान सेवा बंद झाली ती अद्याप बंदच आहे. मागील 13 वर्षांपासून सोलापूरातून विमानाने उड्डाण घेतलेले नाही.
वर्ष 2016 मध्ये उडान योजनेत सोलापूरचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी विमान सेवेच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याने विमान सेवेला खो बसला. आता चिमणीचा अडथळा दूर झाला आहे. सोलापूर महानगर पालिकेने 15 जून 2023 रोजी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली. यामुळे आता सोलापूरातून विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विमान सेवा सुरु झाल्यास परदेशी भाविकांची रिघ वाढेल
पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी वर्षभर भाविक येतात. यात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात 20 ते 30 लाख भाविक येतात. विमान सेवा सुरु झाल्यास देशभरातील भाविकांसाठी एक जलद वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. त्याशिवाय परदेशातील भाविकांची रिघ वाढेल, असे जाणकारांचे मत आहे. मागील काही वर्षात आषाढी वारीत परदेशी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विमान सेवा सुरु झाली तर परदेशातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे.
अक्कलकोट आणि गाणगापूरसाठी ठरणार फायदेशीर
सोलापूर जिल्ह्यात श्री स्वामी समर्थांची समाधी अक्कलकोट तालुक्यात आहे. सोलापूरपासून अक्कलकोट 40 किलोमीटरवर आहे. गाणगापूर हे दत्तसंप्रदायतील महत्वाचे तीर्थक्षेत्र असून ते कर्नाटक राज्यात आहे. सोलापूर विमानतळ होटगी रस्त्यावर असल्याने अक्कलकोट आणि गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी फायदेशीर ठरेल. केंद्र सरकारने उडान योजनेबाबत पुन्हा चालना दिली तर सोलापूरातून लवकरच विमान सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. ज्याचा फायदा सोलापूरला धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना होईल.
श्री सिद्धेश्वर साखर कारखाना आणि चिमणीचा वाद
सोलापूर जिल्ह्यातील साखर उत्पादकांपैकी एक श्री सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. या कारखान्यात जवळपास 1900 कामगार आहे. सोलापूरातील 28 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यास ऊस पाठवला जातो. साखर उत्पादन आणि वीज उत्पादन केले जाते. चिमणी पाडल्याने मोठ नुकसान झाल्याचा आरोप कारखाना व्यवस्थापनाने केला आहे. चिमणी पाडल्याने दोन वर्ष ऊसाचे गाळप करता येणार नाही. यामुळे कारखान्याचे किमान 1000 कोटींचे नुकसान होईल, असा दावा सिद्धेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केला.