बॅंक, इन्कम टॅक्स, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडशी संबंधित काही व्यवहार करायचे असतील तर पॅन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट वेळोवेळी मागितले जाते. बॅंकेत खाते उघडायचे असेल किंवा पैसे भरायचे असतील तर पॅनकार्ड मागितले जाते. पॅन कार्ड सहसा वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढतात. पण वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीदेखील पॅन कार्ड काढता येऊ शकते. ते कसे काढायचे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. 18 वर्षांखालील मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी त्यांच्या पालकांना अर्ज करावा लागतो. हा अर्ज ऑनलाईन कसा करायचा हे आपण टप्प्या टप्प्याने समजून घेणार आहोत.
पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईल अर्ज करण्यासाठी अर्जदाराचा म्हणजेच 18 वर्षांखालील मुलांच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे. तर पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेचे पासबुक, मालमत्ता नोंदणी दस्तऐवज (Property Registration Document) किंवा मूळ रहिवासी प्रमाणपत्राची (Domicile Certificate) प्रत सादर करावी लागेल. त्याचबरोबर 18 वर्षांखालील मुलाच्या वयाचा पुरावा, फोटो आणि पालकांच्या सहीचा फोटो लागतो.
जरूर वाचा : आधार - पॅन कार्ड असे लिंक करा
असा ऑनलाईन अर्ज करा
- पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम NSDLच्या वेबसाईटला भेट द्या.
- तिथे अर्जदाराची योग्य कॅटेगरी निवडून सर्व वैयक्तिक माहिती भरा.
- आता अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा आणि पालकांच्या फोटोसह इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर पालकांची सही अपलोड करा.
- पॅनकार्डची 107 रुपये फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर एक पावती क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या आधारे तुम्ही अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
- ही प्रक्रिया केल्याचा तुम्हाला एक मेल येईल.
- पॅनकार्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत पॅनकार्ड तुमच्या घरी पोहोचेल.