मागचं वर्षभर भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधली (Pakistan) परिस्थिती बिकट आहे. परकीय चलनाचा तुटवडा (Foreign Reserve Crisis) आणि पुरामुळे (Pakistan Floods) झालेलं नुकसान यामुळे तिथे भयंकर आर्थिक संकट (Economic Crisis) उभं राहिलं आहे. तयार पिठाच्या किमती गगनाला भिडल्यात. आणि किलोमागे 700-800 रुपयांपर्यंत पोहोचल्यात. तिथली नेमकी परिस्थिती आणि त्याची कारणं तुम्ही इथं पाहू शकता .
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ (Shahbaz Sharif) परदेशातून मदत मागण्यासाठी जिनिव्हा (Geneva) इथं पोहोचले आहेत. मित्र देश सौदी अरेबियानेही (Saudi Arabia) मदतीचा एक हप्ता थकवल्यामुळे आंतरराष्ट्रीय दरवाजे ठोठावण्यावाचून पाकिस्तानसमोर पर्याय राहिलेला नाही.
सगळ्यात जास्त टंचाईची झळ खैबर पख्तुनवा, सिंध प्रांत आणि बलुचिस्तानला बसली आहे. आणि बाजारात अन्न-धान्य उपलब्ध नसल्यामुळे आणि असलेलं धान्य अवाक्याबाहेरचं असल्यामुळे इथं बाजारपेठांमध्ये चेंगरा चेंगरी आणि दंगलीचे किरकोळ प्रसंगही घडले आहेत. इस्लामाबाद, लाहोर, कराची या शहरांमध्ये धान्याच्या 10 किलो पोत्यासाठी 1,500 पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत.
बाजारपेठांपर्यंत माल पोहोचत नसल्यामुळे हजारो लोक रांगेत उभे आहेत. पण, त्यांना अन्न मिळत नाही असं चित्र जवळ जवळ प्रत्येक बाजारात आहे. सरकारने अनुदान देऊ केलं असलं तरी तेवढा पुरवठाच सरकारी दुकानांमध्ये नाही.
बलोचिस्तानच्या सरकारी गोदामांमध्ये गव्हाचा एकही दाणा नसल्याचा SOS संदेश तिथून केंद्रसरकारला पाठवण्यात आलाय.
पाकिस्तान मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सौदी अरेबियावर अवलंबून आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानला 8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी रक्कम देऊही केलीय. पण, त्यातल्या शेवटच्या हप्त्यापूर्वी आधीच्या कर्जाची पुनर्रचना त्यांना करून हवीय. आणि तिला वेळ लागत असल्यामुळे सौदीकडून येणारी मदतही सध्या थांबलीय.
पुढचे काही महिने पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण पण, तितकेच महत्त्वाचे असणार आहेत.