मागील वर्षभरात लहरी हवामानाचा फटका तांदूळ आणि गहू या पिकांच्या उत्पादनाला बसला. दुष्काळी परिस्थिती आणि उष्णतेच्या लाटेमुळे गहू आणि तांदळाचे उत्पादन कमी झाले. देशांतर्गत अन्नसुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून केंद्र सरकारद्वारे अन्नधान्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली तसेच विविध सरकारी योजनांद्वारे नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किमतीतही मोठी वाढ झाली. वाढत्या खतांच्या किमतीचाही कृषी क्षेत्राच्या उत्पादनाला फटका बसला.
अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतीमुळे केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जवळपास ८० कोटी नागरिकांना ५ किलो अन्नधान्य मोफत दिले. ही योजना मागील वर्षी डिसेंबरमध्ये बंद करण्यात आली. मात्र, आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ३१ मार्च २०२३ पर्यंत ५ किलो धान्य मोफत देण्यात येणार आहे. रबी हंगामात अन्नधान्याचे उत्पादन जास्त होईल, अशी आशा कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. सोबतच सरकारने किमान आधारभूत किंमत (MSP) मध्येही वाढ केली आहे.
२०२३ वर्षातही कृषी मालाच्या किंमती जास्त असल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही हिताचे संरक्षण करण्याचे आव्हान सरकारपुढे असणार आहे. एकंदर विचार करता २०२२ वर्षात कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केली. मात्र, लहरी हवामानामुळे काही पिकांना फटका बसला. २०२३ वर्षात गव्हाचे चांगले उत्पादन होईल, अशी आशा असल्याचे नॅशनल रेनफेड एरिया अथॉरिटीचे सीईओ अशोक दलवानी यांनी म्हटले आहे. खराब हवामान आणि उष्णतेच्या लाटेमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पीएम किसान आणि प्रधान मंत्री फसल बिमा योजनेद्वारे भरुन काढण्यात आल्याचे दलवानी म्हणाले.
२०२१-२२ वर्षात देशात ३१५.७२ मिलियन टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. तर त्याआधी म्हणजे २०२०-२१ वर्षात ३१०.७४ मिलियन टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. २०२२ वर्षात गव्हाचे उत्पादन १०६.८४ मिलियन टन झाले. त्याआधी म्हणजे २०२१ वर्षात गव्हाचे उत्पादन १०९.५९ मिलियन टन झाले होते.