शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंगमधील कॉल आणि पूट खरेदी करताना अनेक गोष्टी पाहाव्या लागतात; तरच त्यातील जोखीमही कमी होते आणि नफ्याचीही शाश्वती राहते. याउलट कसलाही अभ्यास न करता भावनिक विचार करुन किंवा हल्लीच्या काळात फोफावलेल्या सोशल मीडियावरील सल्ल्यांचा आधार घेत अविचारीपणाने ऑप्शन ट्रेडिंग केल्यास भरघोस नुकसान पदरी येण्याची शक्यता असते.
खरे पाहता युट्युब YouTube सारख्या सोशल मीडियावर ऑप्शन ट्रेडिंगची अथ पासून इति पर्यंतची माहिती देणारे असंख्य व्हिडिओ आहेत. पण त्यांचा आधार घेऊन अभ्यासपूर्ण ट्रेडिंग करण्याऐवजी आयत्या सल्ल्यांच्या मागे अनेक जण धावतात आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तो होतोच! म्हणूनच ऑप्शन ट्रेडिंगमधील प्राथमिक माहिती तरी या व्यवहारात येण्यापूर्वी असलीच पाहिजे.
उदाहरणार्थ, कॉल आणि पूट खरेदी करताना त्याचे इन द मनी (In the Money), आऊट द मनी (Out the Money) आणि अॅट द मनी (At the Money) असे प्रकार आहेत. या प्रकारानुसार त्याचा फायदा-तोटा जोडलेला आहे, हे लक्षात घ्या. समजा, निफ्टीचा निर्देशांक 17225 च्या जवळपास आहे आणि आपल्याला जर इथून बाजार आणखी 50-100 अंक वर जाईल असे वाटत असेल तर आपल्याला कॉल खरेदी करावा लागतो. सदरचा कॉल घेताना आपण 17100 च्या खालील अंकपातळीसाठीचे कॉल खरेदी केल्यास त्याला इन द मनी कॉल म्हटले जाते. समजा आपण 17200 चा कॉल खरेदी केल्यास त्याला अॅट द मनी म्हटले जाते; याउलट 17300 पासून पुढील पातळीचे कॉल घेतल्यास त्याला आऊट द मनी कॉल म्हणतात.
नफ्याच्या हमीनुसार किंवा जोखमीच्या पातळीनुसार या कॉल प्रकारांच्या किमतीही ठरत असतात. इन द मनी कॉल जितक्या खालच्या पातळीवरील घेऊ तितका तो जास्त किमतीला मिळतो. अॅट द मनी कॉल हा त्यापेक्षा थोड्या कमी किमतीत मिळतो; तर आऊट द मनी कॉलचे भाव त्या-त्या पातळीनुसार कमी होत जातात.
साधारण नवीन गुंतवणूकदारांनी इन द मनीचे कॉल खरेदी करावेत. जेणेकरुन यामध्ये चटकन नफा मिळवून बाहेर पडण्याची संधी मिळते. याबाबत एक उदाहरण पाहू. निफ्टी 17220 च्या पातळीवर असताना 16900 चा कॉल समजा 320 रुपयांना आहे. 17200 चा 250 रुपयांना आणि 17400 चा 100 रुपयांना असेल आणि इथून निफ्टी वरच्या दिशेला झेपावत 17400 च्या नजीक गेला तर इन द मनी कॉल असलेल्या कॉलचा भाव 320 वरुन 450 च्या पुढे गेलेला असेल; अॅट द मनीच्या कॉलचा भाव 250 वरुन 350 च्या पुढे गेलेला असेल तर आऊट द मनी कॉलमध्ये मात्र यातुलनेने कमी वाढ झालेली दिसेल. असाच प्रकार बँक निफ्टीच्या व्यवहारातही होतो. वरील उदाहरणात वाढीच्या किमती या अंदाजे आहेत, त्यातील आशय असा की सुरक्षिततेसाठी अधिक पैसे मोजण्याची तयारी ठेवावी!
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            