IT हार्डवेअर क्षेत्रात उद्योग उभारण्याचा जर तुम्ही विचार करत असाल आणि त्यासाठी सरकारी मदत देखील मिळवायची असेल तर एक महत्वाची बातमी आली आहे. भारत सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) स्कीम 2.0 अंतर्गत अर्जांची विंडो 1 जूनपासून म्हणजेच उद्यापासून अर्जदारांसाठी खिली होणार आहे.
अलीकडेच, सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशाच्या उत्पादन क्षमतांना चालना देण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी 17,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चासह IT हार्डवेअरसाठी PLI योजना 2.0 मंजूर केली आहे.
प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) ही योजना भारत सरकारने विविध क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सुरू केलेला एक महत्वाचा उपक्रम आहे. ‘मेड इन इंडिया’ साठी भारताने गेल्या काही वर्षात विशेष प्रयत्न चालवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय युवा उद्योजकांना अधिकाधिक सोईसुविधा उपलब्ध करून देणे आणि देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, देशांतर्गत उत्पादन वाढवणे तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि जागतिक स्पर्धेत भारतीय उद्योगांची ओळख वाढवणे हे देखील या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
.@GoI_MeitY invites applications for incentives under PLI 2.0 for IT Hardware
— PIB India (@PIB_India) May 30, 2023
PLI Scheme 2.0 for IT Hardware is expected to result in the broadening and deepening of manufacturing ecosystem by encouraging the localisation of components & sub-assemblies & allowing for a longer… pic.twitter.com/jur1RiXnDi
आर्थिक प्रोत्साहन देण्याची तरतूद
PLI योजनेंतर्गत, विशिष्ट उत्पादने तयार करणाऱ्या पात्र कंपन्यांना (ज्यांनी या योजनेत नोंदणी केली आहे अशाच कंपन्यांना) त्यांच्या वाढीव विक्री किंवा उत्पादनावर आधारित आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. हे प्रोत्साहन अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान अपग्रेडेशन आणि जागतिक पुरवठा साखळी एकत्रीकरण यांसारख्या घटकांमुळे उत्पादकांनी केलेल्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
या योजनेचा कालावधी सरकारने सहा वर्षांचा ठेवला आहे. या योजनेत अपेक्षित गुंतवणूक 2,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल असा सरकारचा अंदाज आहे. या योजनेद्वारे किमान दोन लाख रोजगार निर्माण होईल असा दावा सरकारने केला आहे.
भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उत्पादनात गेल्या आठ वर्षांत 17 टक्के चक्रवाढ पद्धतीने सातत्यपूर्ण वाढ झाली आहे आणि या वर्षी 105 अब्ज युएस डॉलर्सचा मोठा टप्पा आपण ओलांडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतात देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात वाढ होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा हातभार लागणार आहे.
IT हार्डवेअरमध्ये या उत्पादनांना मागणी
प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) स्कीममध्ये लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी, सर्व्हर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादनास प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच 2025-26 पर्यंत सुमारे 300 अब्ज युएस डॉलर्सची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची उलाढाल करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. तसेच सेमीकंडक्टर, आयसी उत्पादने आणि पॅकेजिंगसाठी देखील उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
कशी कराल नोंदणी?
अर्जदार कंपनीला https://www.meity.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना कंपनीचे नाव, कॉर्पोरेट ओळख क्रमांक (CIN), अर्जदार कंपनीचा PAN नंबर, अर्जदार कंपनीच्या स्थापनेची तारीख अशी प्राथमिक माहिती द्यावी लागेल.
तसेच PLI योजनेसाठी अधिकृत नोडल ऑफिसरचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक देखील द्यावे लागणार आहे. तसेच नोडल ऑफिसरचे प्राधिकरण पत्र (Authority Letter) आणि निगमन प्रमाणपत्र (Certificate of incorporation) देखील अपलोड करावे लागणार आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होऊ शकणार नाहीये.
वरील माहिती सबमिट केल्यावर, नोडल ऑफिसरच्या ई-मेल आयडीवर मोबाईल क्रमांकाच्या पडताळणीसाठी लिंकसह एक मेल पाठवला जाईल. त्यानंतर अर्जदाराला 48 तासांच्या आत पोर्टलवर नोंदणीची पुष्टी करण्यासाठी एक मेल प्राप्त होईल.