दाक्षिणात्य दिग्दर्शक ॲटली दिग्दर्शित व शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला जवान चित्रपट गेला आठवडाभर ॲडव्हान्स बुकिंगमध्येच धुमाकूळ घालत होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच काल प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने भारतभरात तब्बल 75 कोटींचा व्यवसाय केला आणि बॉलीवूड बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचला आहे जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवानने 150 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Table of contents [Show]
किंगने मोडला स्वतःचाच विक्रम
रिलीजच्या पहिल्याच दिवशी एवढी मोठी कमाई करणारा ' जवान' हा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट ठरला आहे . याआधी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशी 57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे आता 'जवान' च्या निमित्ताने शाहरुख खानने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे.
'sacnilk' या वेबसाईटच्या मते, ' जवान' ने कमावलेल्या 75 कोटी रुपयांपैकी 65 कोटी रुपये हे हिंदीमधून तर दहा कोटी रुपये हे डब केलेल्या तमिळ आणि तेलगू चित्रपटातून आले आहेत.
देशभरातून जवानचे शोज जोरात
चेन्नईमध्ये 81 टक्के, मुंबईमध्ये 55 टक्के, हैदराबाद आणि कोलकाता येथे 75 आणि 73 टक्के तर एनसीआर (NCR) प्रदेशात 60 टक्के एवढी 'जवान' च्या शोजची व्याप्ती नोंदवली गेली आहे.
वीकेंडला खेचणार गर्दी
शाहरुख खानचा चित्रपट अन् गर्दी होणार नाही म्हटल्यावर अशक्यच. याची प्रचिती रिलीजच्या पहिल्याच दिवशी सर्वांना आली आहे. कारण, ‘जवान’च्या पहिल्या दिवशीच सर्व शोज हाऊसफुल्ल होते. त्यामुळे येणाऱ्या विकेंडला चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.
पहाटे पाच वाजता शो
जिथे देशभरात जवानची ओपनिंग जोरदार झाली आहे. त्या कोलकातामध्ये शाहरुखच्या ' जवान' विषयी वेगळीच उत्सुकता बघायला मिळत आहे. येथील मीराज सिनेमाचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ' जवान' सिनेमाचे तुफान वेड बघता सकाळी पाच वाजता शोचे शेड्युल केले आहे. त्यामुळे शाहरुखचा जवान कोटींचे उड्डाण घेणार यात शंकाच नाही.
तसेच, जवान रिलीज झाल्यापासून सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने देखील जवानला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय इंडस्ट्रीमधील अनेकांनी जवानवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.