ओडिसा राज्यात 1 हजार कोटींचा ऑनलाईन पॉन्झी घोटाळा समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात विविध राज्यातील जवळपास 2 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बॉलिवुडमधील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
ओडिसा आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) या पॉन्झी घोटाळ्याचा तपास केला जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अनेक देशांमध्ये सोलर टेक्नो अलायन्स (STA -token)ही ऑनलाईन कंपनी बेकायदेशीरपणे 'पिरॅमिड स्ट्रक्चर्ड' पद्धतीने काम करत होती. कंपनीने क्रिप्टो गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले का याबाबत पोलीस तपास करत आहेत.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी अनेक देशांमध्ये ऑनलाईन सक्रिय असून ती क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करत होती. या 'पोन्झी' घोटाळ्यात EOW ने अभिनेता गोविंदा याच्यावर संशय व्यक्त केला आहे. गोविंदा यांनी कंपनीचे प्रमोशनल व्हिडिओ केले होते. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी गोविंदा यांची चौकशी केली जाणार आहे.
ओडिशातील EOW महानिरीक्षक जे.एन पंकज यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये गोव्यात झालेल्या STA च्या भव्य समारंभातही अभिनेता गोविंदा यांचा सहभाग होता. गोविंदा यांची चौकशी करण्यासाठी लवकरच तपास पथक मुंबईला रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातील 2 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक
कंपनीने भद्रक, केओंझार ,बालासोर, मयूर भंजन आणि भुवनेश्वरमधील १० हजार गुंतवणूकदारांकडून ३० कोटी गोळा केल्याचे बोलले जाते. कंपनीने बिहार, उत्तर प्रदेश ,पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, झारखंड आणि इतर राज्यातील 2 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी या योजनेत 1000 कोटी गुंतवल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या घोटाळ्यात यापूर्वीच कंपनीचे भारतातील प्रमुख गुरजेत सिंग सिद्धू आणि निरोद दास यांना अटक करण्यात आली आहे. कंपनीचे प्रमुख डेव्हिड गेज या हंगेरियन नागरिकाविरुद्ध लूकाऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.