TDS on Online Gaming: ऑनलाईन गेम खेळताना त्यावर पैसे लावणाऱ्यांनी आता काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. कारण ऑनलाईन गेममधून मिळालेले पैसे, बोनस, रिवॉर्ड्स हे खात्यातून काढल्यावर त्यावर सरकारने टीडीएस म्हणजेच टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या बरेच जण आपल्या स्मार्टफोनवर ऑनलाईन गेम खेळताना आपण पाहतो. काही जण तर यातून भरपूर पैसेही मिळवत आहेत. पण या पैशांचा वापर त्यांना आता फक्त गेम खेळण्यासाठीच करता येणार आहे. कारण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Tax-CBDT) स्पष्ट केले आहे की, ऑनलाईन गेममधून मिळालेल्या पैशांचा वापर हा फक्त तो गेम खेळण्यासाठीच केला जाऊ शकतो.
30 टक्के द्यावा लागणार टीडीएस
एखाद्याने ऑनलाईन गेममधून जिंकलेली रक्कम खात्यातून काढली तर त्याला त्यावर सरकारला टीडीएस द्यावा लागणार. यामध्ये इन्कम टॅक्स विभागाने कमाल रुपयांची अट ठेवली आहे. जसे की, 2023-24 या आर्थिक वर्षात एखाद्या व्यक्तीने वर्षभरात 10,000 रुपये ऑनलाईन गेममधून जिंकले असतील तर त्याला त्यावर 30 टक्के टीडीएस द्यावा लागणार.
1 जुलैपासून लागू होणार
ऑनलाईन गेम आणि त्यातून मिळणारे रिवॉर्ड्स याबाबत नवीन गाईडलाईन सरकारकडून येणे अपेक्षित होते. त्यानुसार सरकारने ऑनलाईन गेमिंगमधून मिळणाऱ्या पैशांबाबत नवीन टीडीएस नियम जाहीर केले आहेत. या नियमानुसार जिंकलेली रक्कम खात्यातून काढल्यास त्यावर ऑनलाईन गेम खेळणाऱ्याला टीडीएस द्यावा लागणार आणि हा नियम 1 जुलैपासून लागू करण्यात आला आहे. याबाबत सीबीडीटीने हे देखील स्पष्ट केले आहे की, इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 194 BA अंतर्गत ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या रकमेवर जीएसटी लावला जाणार नाही.
जिंकलेले पैसे खेळासाठीच वापरले तर 'नो टॅक्स'
ऑनलाईन गेम खेळणाऱ्या आणि त्यातून पैसे मिळवणाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या शेवटी याची सर्व माहित सरकारला म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाला द्यावी लागणार आहे. त्यातून वर्षभरात एकूण जिंकलेल्या रकमेवर टॅक्स देखील भरावा लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने त्या वर्षभरात जिंकलेली रक्कम खात्यातून काढली नाही आणि त्या रकमेचा वापर फक्त गेम खेळण्यासाठी केला तर त्याला त्यावर टॅक्स भरावा लागणार नाही.