Cheating customers by giving discounts: अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा या प्रसिद्ध वेबसाईट्स व्यतिरीक्त असंख्य ई-कॉमर्स वेबसाईट्स आहेत, ज्यावरुन मोठ्या प्रमाणात शॉपिंग होत असते. जवळपास सर्वच शॉपिंग साईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काऊंट्स, सेल लावत असतात. मात्र ऑनलाईन जगात अनेक फ्रॉड वेबसाईट आहेत, ज्या डिस्काऊंट, जाहिराती दाखवून ग्राहकांना शॉपिंग करायला भाग पाडतात, मात्र वस्तू काही घरपोच करत नाहीत.
अशी होते फसवणूक (How Fraud Happens on E-Commerce Websites?)
युट्यूबवर सर्फ करत असताना, सायकलची जाहिरात अवन्तिकाला दिसली. ती सायकल नवीन लाँच होत असल्याने त्यावर 90 टक्के सूट लावल्याचे सांगितले होते. जाहिरात उघडून त्या वेबसाईट पोहोचल्यावर समजले सायकर केवळ 2 हजार रुपयांना आहे. सायकलचे फिचर्स अगदी कमाल होते, त्याच फिचर्सची सायकल बाजारात 8 ते 12 हजार रुपयांना मिळत होती. आता एवढ्य स्वस्तात सायकल मिळते आहे, तर लगेच घेऊया असा विचार अवन्तिकाने केला आणि उत्साहाच्या भरात लगेच सर्व पेमेंट करून सायकल बूक केली. ऑर्डर करून महिना उलटला, तीन महिने उलटले तरी काही झाले नाही, सायकल आली नाही, तक्रारीला त्या कंपनीने जवाब दिला नाही. कॉल आणि व्हॉट्सअॅपवर तिचा नंबर ब्लॉक केला गेला. शेवटी, रक्कम कमी होती म्हणून तिने पुढे तक्रार केली नाही. अशाप्रकारे त्या फ्रॉड वेबसाईट चालवणाऱ्यांनी अनेकांना गंडा घातला असेल.
एक प्रिटेंड, फंकी शर्ट विकणारी वेबसाईट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरात करत होती. तर सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरने त्यावरुन कपडे मागवले मात्र ते कपडे इमेजमध्ये दाखवले त्यापेक्षा वेगळेच होते, त्याची क्वालिटीही खराब होती आणि याहून वाईट म्हणजे ते कपडे वापरलेले होते. त्या कपड्यांची किंमती 5 हजार होती, मात्र कपडे 500 रुपयांचे आले होते, असे त्या इन्फ्लुएन्सरने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले होते.
शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी? (What care should be taken while shopping?)
दिवसागणिक नव्या ई-कॉमर्स म्हणजे शॉपिंग वेबसाईट सुरू होत आहेत. याचाच फायदा घेऊन भामटे खोटी वेबसाईट सुरू करतात आणि नागरिकांना फसवतात. यासाठी शॉपिंग करताना, त्या वेबसाईटची माहिती काढायला हवी. त्या वेबसाईट्सचे सोशल मिडिया पेज तपासावे, त्यावरील इतर व्यक्तींच्या कमेंट वाचाव्यात. तसेच त्या वेबसाईटवर दिलेला पत्ता, फोन नंबर तपासावेत. यासह कंपनीबाबत गुगलवर सर्च करावे. त्या कंपनीबाबत युट्यूब, इन्स्टाग्रॅमवर शॉपिंग व्हिडीओ आहे का हेही तपासावे, जेणेकरून त्या वेबसाईटवरील वस्तू चांगल्या असतात हे लक्षात येईल. यासह, त्या वेबसाईटची रिटर्न पॉलिसी वाचून घ्यावी, रिटर्न होणार नसेल तर खरेदी करू नये किंवा विश्वास असल्यास खरेदी करावी पण कमी रक्कमेची खरेदी करावी, जेणेकरून फसवणूक झाली तरी जास्त पैसे वाया जाणार नाहीत. मॅकफी, क्विक हिल यांसारख्या अँटीव्हायरसद्वारे फेक वेबसाईट लगेच ओळखता येते. तसेच डिजीसर्ट टुलमार्फत वेबसाईट फेक आहे की खरी हे काही क्षणांत तपासता येते, ही माहिती डिजिटल मार्केटींग तज्ज्ञ राहुल शर्मा यांनी दिली.