फ्रान्समधील पॅरिसमध्ये होणाऱ्या वर्ष 2024 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील तिकिटांची विक्री सुरु झाली आहे.दुसऱ्या टप्प्यात जवळपास 15 लाख तिकिटांची लॉटरी पद्धतीने विक्री होणार आहे. जगभरातील 40 लाख प्रेक्षकांनी ऑलिम्पिक तिकिटासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी भाग्यवान 15 लाख विजेत्यांना याची देही याची डोळा पॅरिस ऑलिम्पिक सोहळा पाहता येणार आहे.
ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच तिकिटांची ऑनलाईन विक्री होणार आहे. उपलब्ध तिकिटांच्या तुलनेत मागणी चार ते पाच पटीने प्राप्त झाली आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक कमिटीने लॉटरी पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. पॅरिस शहरात 37 वेगवेगळ्या ठिकाणी ऑलिम्पिकचे सामने होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 32 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. ऑलिम्पिकच्या भव्यदिव्य आयोजनासाठी फ्रान्स सरकारने कंबर कसली आहे. फ्रान्समध्ये ऑलिम्पिकची जोरदार तयारी सुरु आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी तब्बल 1 कोटी तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. त्यापैकी 34 लाख तिकिटे ही पॅराऑलिम्पिक स्पर्धेची आहेत. पॅराऑलिम्पिक स्पर्धा 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2023 या काळात पार पडणार आहे. पॅराऑलिम्पिक स्पर्धेची तिकिट विक्री 4 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पहिल्या टप्प्यात 32 लाख 50 हजार तिकिटांची विक्री करण्यात आली होती.ऑलिम्पिकचे सामने थेट ग्राउंडवर जाऊन बघता यावेत, यासाठी जगभरातून 40 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी तिकिटासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक कमिटीने तिकिटांची ऑनलाईन लॉटरी पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या 40 लाखपैकी 15 लाख प्रेक्षकांना तिकिटे उपलब्ध होणार आहेत. पुढील 48 तास ऑनलाईन पद्धतीने तिकिटांची विक्री केली जाईल, असे पॅरिस ऑलिम्पिकचे डेप्युटी जनरल मॅनेजर मायकेल ऑलिसिओ यांनी सांगितले. पॅरिस ऑलिम्पिकचे सर्वात स्वस्त तिकिटांची विक्री लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
लॉटरीनुसार निवड झालेल्या प्रेक्षकाला ऑनलाईन तिकिट खरेदी करता येईल. यात एक व्यक्ती जास्तीत जास्त 30 तिकिटे खरेदी करु शकते. मात्र प्रत्येक स्पर्धेसाठी 6 पेक्षा जास्त तिकिटे खरेदी करता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यात उद्घाटन सोहळा, समारोप सोहळा आणि महत्वाच्या क्रीडा स्पर्धांच्या अंतिम सामन्यांसाठी एका व्यक्तीला जास्तीत जास्त 4 तिकिटांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी किमान तिकिट 24 युरोचे (भारतीय चलनात 2150 रुपये) असून सर्वात महागडे तिकिट 200 युरो (भारतीय चलनात 17950 रुपये इतके आहे.