Investment in Silver: महागाई अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाही. जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर आर्थिक मंदीचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मागील वर्षभरात चांदीने प्रत्येक किलोमागे जवळपास 10,000 रुपयांचा परतावा दिला आहे. 10 वर्षांपूर्वी चांदीचा दर 61 हजार रुपये होता तो आता वाढून 71,425 रुपयांवर आला आहे. त्यामुळे महागाई आणि जागतिक मंदीच्या काळात चांदी गुंतवणूकदारांसाठी हेजिंग म्हणून काम करू शकते.
Table of contents [Show]
सिल्वर ईटएफ
चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे विविध प्रकार आणि पर्याय उपलब्ध आहेत. सध्या मार्केटमध्ये सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर पोर्टफोलिओमध्ये कमोडिटीजचा समावेश केला जाऊ शकतो, असे गुंतवणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कमोडिटीमध्ये गुंतवणूक करताना गोल्ड आणि सिल्वर ईटीएफ यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. हा पर्याय प्रत्यक्ष सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा या मौल्यवान धातुंच्या डिजिटल फॉर्ममध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.
सिल्वर ईटीएफ काय आहे?
ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड हे एक प्रकारचे म्युच्युअल फंडच असतात. परंतु त्यास एखाद्या शेअरप्रमाणे खरेदी किंवा विक्री करता येऊ शकते. यात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खात्याची गरज असते. सिल्वर ईटीएफ हे गुंतवणुकदारांच्या पैशांना चांदीत गुंतवणूक करण्याची संधी देते. सिल्वर ईटीएफच्या माध्यमातून चांदीत गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय आहे.
ईटीएफ गुंतवणुकीतील नवीन पर्याय
सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मार्केटमध्ये एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. मिराई अॅसेट म्युच्युअल फंडने सोमवारी (दि. 29 मे) मिराई अॅसेट सिल्वर ईटीएफ लॉन्च केला आहे. ही एक ओपन एंडेड स्कीम असून तो 6 जूनपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. त्यानंतर ही स्कीम 12 जून 2023 रोजी विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा ओपन होणार आहे.
मिराई अॅसेट सिल्वर ईटीएफमध्ये एनएफओच्या दरम्यान गुंतवणूक करताना किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. या ईटीएफचे व्यवस्थापन रितेश पटेल हे पाहणार आहेत. सेबीने सिल्वर ईटीएफला परवानगी दिल्यानंतर 2022 मध्ये आतापर्यंत 8 सिल्वर ईटीएफ लॉन्च झाले आहेत. या ईटीएफमध्ये 1785 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
- चांदीचा इंडस्ट्रीमध्ये वापर होतो त्यामुळे इंडस्ट्रीच्या मागणीनुसार चांदीच्या किमतीत वेळोवेळी वाढ होत असते.
- चांदी ही महागाईच्या विरोधात हेजिंगचे काम करते आणि त्याचवेळी डॉलरची वाढता दर हा देखील त्याच्या विरोधात काम करते.
- मागील 5 वर्षात चांदीने 13.1 टक्के परतावा दिला आहे; जो निफ्टी 50 इंडेक्सच्या 12.3 टक्के आणि सोन्याच्या 13.0 टक्क्क्यांपेक्षा जास्त (30 एप्रिल, 2023 पर्यंत) आहे.
- मागील 2 वर्षात 2021 आणि 2022 मध्ये चांदीची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त होती. पण तरीही इतर घटकांमुळे चांदीच्या किमतीमध्ये पाहिजे तितके वाढ झालेली नाही.