अमेरिका आणि युरोपातील बँकिंग संकट आणि मंदी आणि महागाईचा वाढता प्रभाव यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भरवशाची गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळाले आहेत. सोने आणि चांदीचा भाव मागील महिनाभरात प्रचंड वाढला आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये तेजीचा ट्रेंड जास्त आहे. नजीकच्या काळात चांदी 84000 रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज कमॉडिटी विश्लेषक व्यक्त करत आहेत.
बऱ्याच वर्षांनंतर चांदीला तेजीची झळाळी मिळाली आहे. कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 61000 रुपयांवर गेला होता. त्याचबरोबर चांदीने सुद्धा दमदार कामगिरी केली आहे.एमसीएक्सवर चांदीचा भाव 75000 रुपयांवर गेला आहे.ही तेजी अशीच कायम राहिली तर चांदीचा भाव प्रति किलोला 80000 ते 84000 रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या कमॉडिटी विभागाचे मुख्य विश्लेषक नवनीन दमानी यांनी व्यक्त केला आहे.
चालू वर्षात चांदीमधून 15 ते 18% रिटर्न मिळू शकतो, असे दमानी यांनी म्हटले आहे. अमेरिकेत दोन बँका बुडाल्या. युरोपात एक मोठी बँक डबघाईला आली. रशिया आणि युक्रेन यांच्या दिर्घकाळ युद्ध सुरु आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपात महागाईचा भडका उडाला आहे. अनेक सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. या घडामोडींनी मागील तीन महिन्यात वर्ल्ड मार्केटमध्ये सोने 350 डॉलरने महागले असल्याचे दमानी यांनी सांगितले. चीनकडून पुन्हा एकदा सोन्याची मोठी खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. डॉलर इंडेक्समध्ये आणखी घसरण अपेक्षित असून सोने 2000 डॉलरवरच ट्रेड करेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
सोन्यातील तेजीबाबत चर्चा होत असली तर त्याच्या तुलनेत चांदीची कामगिरी सरस ठरली आहे.मागील तीन महिन्यात चांदीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. सध्या कमॉडिटी बाजारात चांदीचा भाव 75000 रुपयांवर आहे. चांदीने 50000 रुपयांपासून ही मजल मारली आहे. त्यामुळे या पातळीवर ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असेल त्यांना भक्कम रिटर्न्स मिळाले आहेत. चांदी दिर्घकाळापासून एका ठराविक टप्प्यात ट्रेड करत होती. मात्र आता चांदीनेसुद्धा तेजीची वाट धरली आहे. नजीकच्या काळात चांदीचा भाव 80000 ते 84000 रुपयांपर्यंत चांदीचा भाव वाढू शकतो, असे दमानी यांनी म्हटले आहे. या पातळीवर गुंतवणूकादांराना 15 ते 18 % परतावा मिळेल, असे दमानी यांनी सांगितले.
पाच वर्षांत दिला जबरदस्त परतावा
बँकबझार या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार वर्ष 2019 मध्ये चांदीचा एक किलोचा भाव सरासरी 40600 रुपये इतका होता. वर्ष 2020 मध्ये तो 63435 रुपये इतका वाढला. कोरोना रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सोने आणि चांदीमधील गुंतणुकीचा ओघ वाढला होता. याच काळात सोन्याचा भाव 56200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. वर्ष 2021 मध्ये चांदीचा भाव 62572 रुपये इतका होता.लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली. सोने आणि चांदीमधील गुंतवणूक काढून घेतल्याने दोन्ही धातूंच्या किंमतींमध्ये वर्ष 2022 मध्ये मोठी घसरण दिसून आली होती. वर्ष 2022 मध्ये चांदीचा भाव एक किलोसाठी 55100 रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र मागील तीन महिन्यांत त्यात तेजी दिसून आली आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव 75000 रुपयांवर गेला असून सराफा बाजारात हा दर 77000 रुपयांच्या आसपास आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला तर चांदीने सरासरी 60% रिटर्न दिले आहेत.
कोरोना रुग्णवाढ चिंताजनक
मागील आठडाभरात भारतात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरात कोरोनो रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनोने पुन्हा डोके वर काढल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनोमुळे अनिश्चितता वाढली असून त्याचे पडसाद भांडवली बाजारावर उमटत आहेत.त्यामुळे नजीकच्या काळात गुंतवणूकदार सोने आणि चांदीकडे वळण्याची शक्यता आहे.
(डिसक्लेमर: महामनी' कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. वाचकांनी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)