यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन आयकर प्रणालीनुसार (new tax regime) करदात्यांसाठी अनेक सवलतीच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यामध्ये करमाफीसाठी उत्पन्नाच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली होती. त्यानुसार वार्षिक 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली होती. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचा विचार करून करामध्ये सवलती दिल्या आहेत. त्यानुसार वर्षाला ज्यांची कमाई 7.27 लाख इतकी आहे, त्यांना देखील आयकरातून सूट देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
...तर तुम्हाला टॅक्स लागू नाही
कर्नाटकातील उडुपी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या, की सरकारने मध्यमवर्गीय लोकांना अनेक कर सवलती दिल्या आहेत. जेव्हा 2023-24 केंद्रीय अर्थसंकल्पात 7 लाख रुपयांच्या कमाईसाठी कर सवलत प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा काही विभागांमध्ये शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या की काहींचे उत्पन्न हे सात लाखांपेक्षा थोड्या प्रमाणात जास्त असू शकते. अशा सर्व सामान्य नागरिकांना कराचे कक्षेत कशा प्रकारे समाविष्ट करण्यात येईल अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यावर आमच्या टीमने चर्चा करून त्यांनादेखील कर सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीतारमन यांनी सांगितले.
7.27 लाख रुपयांच्या पुढील उत्पन्नास कर लागू
या निर्णयानुसार ज्यामध्ये 7.27 लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास कर देण्याची गरज नाही. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त असेल तर त्या व्यक्तीस कराच्या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आता 7.27 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र 7.27 लाख रुपयांच्या पुढे तुमचे उत्पन्न असल्यास तुम्हाला कर भरावा लागेल. दरम्यान, या नवीन कर प्रणालीत कर दात्यांना 50 हजार रुपयांच्या स्टॅडर्ड डिडक्शन लाभ देखील स्वतंत्रपणे दिला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारच्या उपलब्धींचा उल्लेख करताना त्या म्हणाले की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) एकूण बजेट 2013-14 मधील 3,185 कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 22,138 कोटी रुपये करण्यात आले आहे. नऊ वर्षांत अर्थसंकल्पीय वाटपामध्ये ही जवळपास सात पटीने वाढ झाली आहे. हे लघु उद्योगांना सक्षम करण्यासाठी सरकारची वचनबद्धता दर्शवत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.