देशात आगामी काळात निवडणुकांचं वातावरण असणार आहे.अशात देशातल्या जनतेला निवडणुकांपूर्वी मोदी सरकार एक खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. खासकरून देशातल्या लोअर मिडलक्लास जनतेला हे गिफ्ट मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी हाऊसिंग लोनवर सब्सिडी मिळू शकेल अशा तयारीत सरकार आहे.ही योजना जर प्रत्यक्षात उतरली तर देशभरातल्या होम लोन घेणाऱ्या व्यक्तींना 50 लाखाच्या होमलोनवर 9 लाख रुपयांची सूट मिळू शकेल.
स्मॉल अर्बन हाऊसिंग योजना केंद्रस्थानी
सरकार हाऊसिंग लोन सब्सिडीवर 60 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा विचार करत आहे. यात स्मॉल अर्बन हाऊसिंग योजना याच्या केंद्रस्थानी असणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार पुढील 5 वर्ष व्याजात सूट देण्याच्या पर्यायाचा विचार करत आहे. या योजनेद्वारे देशातल्या जवळपास 25 लाखांपेक्षा जास्त लोकांना फायदा मिळू शकेल असं सांगितलं जात आहे.
काय आहे योजना?
सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही महिन्यात या योजनेची सुरूवात होऊ शकते.या योजनेनुसार एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गृह कर्ज घेतलं तर त्या व्यक्तीला वार्षिक व्याजदरात थोडी सूट मिळू शकते. ही सूट 3 ते 6.5 टक्के इतकी आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपये इतकी असू शकते.अद्याप याबाबत मंत्रिमंडळात चर्चा होणं बाकी आहे. मात्र ही योजना सर्वसंमत झाल्यास साल 2028 पर्यंत ही योजना लागू असेल अशीही माहिती देण्यात आली आहे.
आरबीआयने केली आहे रेपोरेटमध्ये वाढ
आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केल्याने होम लोन किंवा गृहकर्जाचे हफ्ते फेडणं महाग झालं आहे.अशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार गृहकर्जावर सब्सिडी स्कीमची घोषणा करू शकते. गेल्याच महिन्यात सरकारने घरगुती गॅल सिलेंडरच्या दरात कपात केली होती हेही आपल्याला आठवत असेलच.