Netflix Subscription : ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रचलित असलेल्या नेटफ्लिक्सने आपला सबस्क्रिप्शन दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास जगभरातल्या 100 हून अधिक देशांमध्ये नेटफ्लिक्स आपले दर कमी करत आहे. यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे भारतातील प्रेषकांनाही आता कमी दरामध्ये नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज, चित्रपटांचा आनंद लुटता येणार आहे.
नवीन दरांची माहिती
नेटफ्लिक्सने भारताल्या ग्राहकांसाठी 4 वेगवेगळे प्लान डिझाईन केलेले आहेत. जसे की, नेटफ्लिक्स मोबाईल प्लान, नेटफ्लिक्स बेसिक, नेटफ्लिक्स स्टँडर्ड आणि नेटफ्लिक्स प्रिमियम असे हे चार प्लान आहेत. या प्लानच्या जून्या आणि नविन दरांमध्ये जवळपास 50 ते 300 रूपयापर्यंतची तफावत आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सच्या मोबाईल प्लानचे दर प्रति महिना 199 रूपये होते तर बेसिक प्लानचे दर 499 रूपये होते. नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मचे दर हे अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत याआधी खूप जास्त होते. काही प्लॅटफॉर्मच्या वार्षिक दरापेक्षा नेटफ्लिक्सचे प्रति महिना दर अधिक होते. त्यामुळे ग्राहकांकडून सबस्क्राईब करण्याचे प्रमाण हे कमी होते.
ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात काय आहेत नवीन दर.
नेटफ्लिक्सने हा निर्णय का घेतला
नेटफ्लिक्सच्या उच्च दरांमुळे ग्राहकांची संख्या ही कमी होत होती. त्यामुळे मिळणारा महसुलावर सुद्धा नकारात्मक परिणाम होत असल्याचे आढळून आले. यामुळे कंपनीला एकुणच तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे नेटफिक्सने युरोप, आशिया, अमेरिका अशा जवळपास 116 देशांमध्ये सबस्क्रिप्शनचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला.
नेटफ्लिक्सच्या या निर्णयामुळे आपसूकच कमी कालावधीमध्ये सबस्क्रायबर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.नेटफ्लिक्सने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये ही बाब नमुद करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सने म्हटले आहे की, सबस्क्रिप्शन दर कमी केल्यावर ग्राहकांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. तसचं कायम स्वरूपी स्टँडर्ड आणि प्रिमियम प्लान खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा एक स्थिरता आली आहे. थोडक्यात आत्ताचे नवीन दर हे सर्वांना परवडण्याजोगे झाले आहेत.
जगभरातल्या अनेक देशांमध्ये अशा पद्धतीने सबस्क्रिप्शन दर कमी केल्यामुळे नेटफ्लिक्सच्या 2023 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतल्या उत्पन्नांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीमध्ये 1,597 मिलीयन डॉलर उत्पन्नाच्या तुलनेच या तिमाहीमध्ये 1.305 मिलीयन डॉलरचे उत्पन्न मिळाले आहे म्हणजे 18 टक्क्यांची तूट नोंदवली गेली आहे. तरिसुद्धा सबस्क्रिप्शन दर कमी केल्याने ग्राहकांच्या संख्येत होणारी वाढ आणि त्यापासुन मिळणारे दीर्घकालीन उत्पन्न मिळवणे हे धोरण कंपनीने अवलंबले आहे.
या धोरणानुसार कंपनी 2021 पासून आपल्या सबस्क्रिप्शन दरामध्ये फेरबदल करत आहे. तेव्हापासुन नेटफ्लिक्स सबस्क्रायबर्सच्या संख्येत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे तर वार्षिक उत्पन्नांमध्ये 24 टक्क्याची वाढ झाली आहे.