शेअर मार्केटमध्ये तेजीची लाट धडकल्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली. सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला आहे. निफ्टीत 190 अंकांची वाढ झाली असून निफ्टीने 18000 अंकांची पातळी ओलांडली. आजच्या सत्रात एनडीटीव्हीचा शेअर 5% ने वधारला. बीएसईवरी एनडीटीव्हीच्या शेअरने 357.60 ची पातळी गाठली होती.
सध्या एनडीटीव्हीचा शेअर 344.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यात 1.20% वाढ झाली. त्यापूर्वी आजच्या सत्रात एनडीटीव्हीने 357.60 रुपयांपर्यंत मजल मारली होती. त्यात 5% वाढ झाली होती. 52 आठवड्यात एनडीटीव्हीच्या शेअरने 103.50 रुपयांचा नीचांक आणि 567.85 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. मागील सहा महिन्यात तो 540.85 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता.
मागील सहा महिने एनडीटीव्हीचा शेअर चर्चेत आहे.गेल्याच महिन्यात गौतम अदानी यांच्या एएमजी मीडिया वर्क्स लिमिटेड या कंपनीने एनडीटीव्हीवर ताबा मिळवला होता. अदानींनी एनडीटीव्हीचे अतिरिक्त 26% शेअर्स खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर दिली होती.

एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी नुकताच एनडीटीव्हीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रॉय दाम्पत्याकडे एनडीटीव्हीचा 32.26% हिस्सा शिल्लक होता. त्यापैकी त्यांनी 27.26% शेअर्सची अदानी ग्रुपला विक्री केली आहे. यामुळे अदानी समूहाची एनडीटीव्हीतील एकूण हिस्सेदारी 64.71% इतकी वाढली आहे.
रॉय दाम्पत्याने 27.26% शेअर्सची विक्री केल्याचे म्हटले आहे. यात राधिका रॉय यांनी 8912467 शेअर्स आणि प्रणॉय रॉय यांनी 8665209 शेअर्स आरआरपीआर होल्डिंग्ज या कंपनीला हस्तांतर केल्याची माहिती शेअर बाजाराला कळवली आहे. एएमजी मिडिया वर्क्स ही अदानी समूहातील एक कंपनी असून आरआरपीआर होल्डिंग्जमध्ये 99.5% हिस्सा आहे. रॉय दाम्पत्य बाहेर पडल्यानंतर एनडीटीव्हीच्या संचालक मंडळावर संजय पुगलिया यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सेंथिल चेंगावरयन यांची अतिरिक्त संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.