Nashik Citylink Fare Hike: नाशिक महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच सिटीलिंक (Citylink)च्या तिकिटामध्ये बुधवार (दि. 15 फेब्रुवारी) पासून भाडेवाढ करण्यात आली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या परिवहन महामंडळाने शहरी भागांसाठी 2 ते 5 रुपये तर ग्रामीण भागासाठी सुमारे 10 रुपयांची भाडेवाढ लागू केली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या ताफ्यातील बेस्ट परिवहन मंडळ लाखो रुपयांचा तोटा सहन करत मुंबईकरांकडून किमान 5 ते 6 रुपये तिकिटासाठी आकारत आहे.
नाशिक परिवहन महामंडळाने (सिटीलिंक) लागू केलेली नवीन भाडेवाढ ही 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेने दिली. दिवसेंदिवस वाढत जाणारे इंधनाचे दर तसेच परिवहन महामंडळ सहन करत असलेला तोटा लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने ही भाडेवाढ लागू केली. खरे तर महापालिका सिटीलिंकचे नवीन दर 1 जानेवारी, 2023 पासून लागू करणार होती. पण पालिकेने त्यात दीड महिन्यांचा उशीर करून अखेर 15 फेब्रुवारीपासून सिटीलिंकच्या तिकिटदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिककरांच्या खिशाला आजपासून झळ
नाशिक परिवहन महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे यातून महामंडळाने हात वर करून ही सर्व जबाबदारी महापालिकेवर टाकल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार महापालिकेने वाढच्या खर्चाला धरून तिकिटांच्या दरामध्ये वाढ केली आहे. परिवहन महामंडळाच्या नियमानुसार तिकिटांमध्ये 5 टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित होते. पण यावेळी पालिकेने 7 टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे दिसून येते.
नाशिकमधील निमाणी, पाथर्डी, सातपूर, नाशिकरोड, नाशिक शहर आदी ठिकणांहून सिटीलिंकच्या बस सुटतात. तर काही बस या नाशिकच्या ग्रामीण भागापर्यंत सेवा देतात. याचा नाशिकचा नोकरदार वर्ग, महिला, विद्यार्थी हे लाभ घेत असतात. पण आता त्यांना यासाठी 2 ते 3 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. याचबरोबर मासिक पासामध्येही वाढ होणार आहे.
काय आहेत सिटीलिंकचे नवीन तिकिट दर
नाशिक परिवहन महामंडळाच्या नियमानुसार तिकिटांच्या दरात 5 टक्क्यांची वाढ करण्याची मुभा आहे. पण यावेळी पालिकेने महामंडळाला होत असलेला तोटा, इंधनाचे वाढते दर लक्षात घेऊन यावेळची भाडेवाढ 7 टक्क्यांनी वाढवली आहे. शहरी भागासाठी 2 ते 5 रुपये आणि ग्रामीण भागासाठी सुमारे 10 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत अवघ्या 6 रुपयांत गारेगार प्रवास
मुंबईच्या रेल्वेलाईनला मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्याचेच छोटे रूप मुंबईची बेस्ट सेवा आहे. मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेली बेस्ट ही मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात सेवा पुरवते. सध्या मुंबईला लागून असलेल्या इतर महापालिकांच्या परिवहन सेवेतील बसच्या तुलनेत बेस्ट बसचे तिकिट सर्वांत स्वस्त आहे. बेस्टचे किमान भाडे 5 रुपयांपासून सुरू होते. तर एसी बसचे किमान भाडे 6 रुपयांपासून सुरू होते. हल्लीच बेस्टच्या ताफ्यात ई-डबल डेकर बस दाखल झाल्या आहेत. या बसचे 5 किलोमीटरसाठी किमान भाडे 6 रुपयेच ठेवण्यात आले आहे.