Nagar-Manmad Highway: अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील सामाजिक पायाभूत सुविधांसाठी केलेल्या 10 लाख कोटींच्या तरतुदीमुळे आता अनेक पायाभूत सुविधांची कामे मार्गी लागणार आहेत. सुरत-चेन्नई, तसेच पुणे- औरंगाबाद या महामार्गांच्या कामांना गती देतानाच, नगर-मनमाड(Nagar-Manmad) हा 75 कि.मी. महामार्गाची 750 कोटींची तरतूद बजेटमध्ये असेल असा विश्वास जिल्ह्यातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला. त्यामुळे या बजेटचे नगरकरांमधून स्वागत केले जात आहे.
15 दिवसात कामाची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा
देशाच्या अर्थसंकल्पात दळण-वळण, कृषी विकास, औद्योगीक विकास, महिला सक्षमीकरण, सहकार यासह अन्य क्षेत्रात बदल घडविणासाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. नगर जिल्ह्यातील प्रस्तावित हायवे हे बजेटमध्ये समाविष्ट आहेत. नगर जिल्ह्यातून 180 किलोमीटरचा महामार्ग जाणार असून यावर्षीच्या बजेटमध्ये या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या कामाला लवकरच गती मिळेल. तसेच पुणे-औरंगाबाद हा महामार्गही मंजूर असून या मार्गाची 270 किलोमीटर लांबी आहे. पाच हजार कोटींचा सर्वसाधारणपणे हा प्रकल्प आहे. या बजेटनंतर 15 दिवसात कामाची प्रक्रिया सुरू होणार आहे. दैनंदिन प्रवासी तसेच साई-शनिभक्तांसाठी महत्वपूर्ण समजला जाणारा नगर-मनमाड या 75 किलोमीटर महामार्गालाही मंजूरी मिळाली आहे. या बजेटमधून या कामासाठी 750 कोटींचा निधी मिळणार असल्याने हे कामही सुरू होणार आहे.
कृषी क्षेत्रातील तरतूद कमी असल्याने नगरकर नाखूष
बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी कमीत कमी 20 टक्के तरतूद हवी होती, मात्र केवळ 6 टक्के तरतूद झाल्याने काहीशी नाराजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत नगरकरांमध्येही पाहायला मिळत आहे. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठीचे तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधावर पोहचवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. याचा फवारणीसाठी वापर झाल्यामुळे खर्च कमी होईल आहे. याशिवाय खासगी आणि सरकारी गुंतवणूक करून अॅग्रीकल्चर स्टार्टअप बीझनेस सुरू केले जाणार आहेत. यंदाचे वर्ष हे भरडधान्य वर्ष असून बाजरी, नाचणी, ज्वारी या पिकांना प्राधान्य देवून उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. महिला सक्षमीकरणातूनही जिल्ह्यातील 23 हजार बचत गटांचे सबलीकरण केले जाईल.