Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड योजनांमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, त्यासाठी शिस्त आणि संयम हवा. मागील तीन वर्षात SIP द्वारे दर महिन्याला जमा होणाऱ्या राशीत दुपटीने वाढ होऊन हा आकडा 15 हजार 814 कोटींवर पोहचला आहे. मात्र, त्याचवेळी किरकोळ गुंतणुकदारांचे इक्विटी योजनांमधून पैसे काढून घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.
इक्विटी योजनांमधून बाहेर पडणाऱ्यांची टक्केवारी किती?
इक्विटी योजनांमध्ये ज्या किरकोळ गुंतवणुकदारांनी पैसे गुंतवले आहेत त्यापैकी 48% गुंतवणुकदार पहिल्या 2 वर्षात योजनेतून बाहेर पडत असल्याचे AMFI च्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2022-23 आर्थिक वर्षात सर्वात मोठ्या 10 म्युच्युअल फंड वितरकांपैकी 4 संस्थांमधील निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. (equity SIP redemption) या दहा संस्था किरकोळ गुंतवणुकदारांसाठी प्रामुख्याने म्युच्युअल फंड वितरक म्हणून काम करतात.
मार्केट ट्रेंडवर स्वार होऊन निर्णय?
गुंतवणुकदार एका इक्विटी योजनेतून बाहेर पडून दुसऱ्या इक्विटी योजनेत गुंतवणूक करत आहेत का? किंवा थेट कंपन्यांचे इक्विटी शेअर खरेदी करत आहेत का? याबाबत माहिती उपलब्ध नाही. तसेच मार्केटमधील ट्रेंड पाहूनही अनेक गुंतवणुकदार निर्णय घेत असल्याचे दिसून येते.
जर एखादी योजना अल्पकालावधीत चांगला परतावा देत नसेल, तोट्यात असेल तर पैसे काढून घेण्याची शक्यता वाढते. (Early withdrawal from mutual fund) बाजारातील तात्पुरत्या चढउतारांमागील सखोल कारणं किरकोळ गुंतवणुकदारांना सहसा माहिती नसतात. त्यामुळेही गुंतवणुकदार पैसे काढून घेतात.
आर्थिक सल्लागाराची मदत ठरेल फायद्याची
सध्या म्युच्युअल फंडमध्ये एकूण 8.47 लाख कोटी रुपये भारतीयांनी गुंतवले आहे. यात प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. मात्र, योजनेतून दोन वर्षांमध्येच बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने दीर्घकालावधीत चांगला परतावा मिळू शकतो, या शक्यतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. जर एखाद्या इक्विटी संबंधित SIP मधून चांगला परतावा मिळत नसेल तर आर्थिक सल्लागाराचा फायदा घ्यायला हवा. स्वत: घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
गुंतवणुकीचे ध्येय आधी निश्चित करा
कोणतीही एसआयपी सुरू करण्यापुर्वी त्यामागचे ध्येय आणि हेतू निश्चित करून घ्यावा. किती वर्षांनी तुम्हाला पैशांची गरज लागणार आहे. कोणत्या गोष्टींसाठी लागणार आहेत, हे माहिती असेल तर तुम्ही मध्येच पैसे काढून घेण्याची शक्यता कमी होते. गुंतवणुकीला आणि योजनेत राहण्यास एक निश्चित कारण मिळते.
कोणत्या बाबींची जनजागृती गरजेची
तात्पुरत्या काळात बाजार वरखाली होऊ शकतो. त्यामुळे घाबरून न जाता गुंतवणूक सुरूच ठेवावी. एखादी SIP खूपच नकारात्मक परतावा देत असेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन निर्णय घ्या. एसआयपीबद्दल नागरिकांमधील जनजागृती वाढली आहे. मात्र, इक्विटी म्युच्युअल फंडमधील प्रत्येकाची जोखीम क्षमता किती आणि किती काळ गुंतवणूक ठेवायला हवी, याबाबत अधिक जनजागृतीची गरज असल्याचे आर्थिक सल्लागारांचे मत आहे.