बहुतेक जण आयुष्यभर काबाडकष्ट करून बचत केलेल्या पैशांच्या आधारे जीवनाच्या उतारवयात सुखाने आयुष्य जगण्याची स्वप्नं पाहत असतात. पण, प्रत्येकाचे निवृत्तीनंतरचे जीवन हे त्याच्या स्वप्नांसारखं नसतं. कारण बचतीसाठी केलेल्या विविध गुंतवणुकीमधून जो काही परतावा मिळतो. तो निव्वळ परतावा नसतो; त्यासोबत वेगवेगळ्या करांचा भरणादेखील असतो. अशावेळी पै-पै साठवून जमा केलेल्या बचतीमधील बराचसा भाग टॅक्सद्वारे कापला जाऊ शकतो. यासाठी निवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही असे, आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. निवृत्तीनंतर कोणत्या प्रकारच्या उत्पन्नावर किंवा परताव्यावर टॅक्स लागू शकतो. याची माहिती करून घेणं आवश्यक आहे. अशाच सेवानिवृत्तीनंतर लागू होणाऱ्या 3 टॅक्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
सेवानिवृत्तीनंतरच्या या तीन करांची योजना करा
जस जशी दीर्घकालीन गुंतवणूक अधिकाधिक परिपक्व होत जाते, त्यानुसार गुंतवणुकीची प्राधान्ये बदलतात. त्याचप्रमाणे निवृत्त झाल्यावर टॅक्सची स्थितीसुद्धा बदलण्याची शक्यता असते. जसे की, नियमित पेन्शनसह खाली नमूद केलेलं उत्पन्न तुमच्या करपात्र उत्पन्नाचा मोठा भाग बनू शकतं.
1. भाड्यातून मिळणारे उत्पन्न
2. मालमत्ता विक्रीतून मिळणारे उत्पन्न
3. व्याज, लाभांश आदींमधून मिळणारे उत्पन्न
घराच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स
बहुतेक पेन्शनधारकांसाठी भाड्याचे उत्पन्न हे निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत असतो. इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार, अशाप्रकारे मिळणारे उत्पन्न भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नात वर्गीकृत केले जाते. त्यामुळे घराच्या मालमत्तेतून भाड्याद्वारे मिळणारे उत्पन्न इन्कम टॅक्सच्या स्लॅबनुसार, एखाद्याचे एकूण करपात्र उत्पन्न वाढवू शकते.
मालमत्ता विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स
मालमत्ता विक्रीतून मिळणारा भांडवली नफा हा सहसा करपात्र उत्पन्न म्हणून वर्गीकृत केला जातो, जसे की,
1. हस्तांतरित केलेली मालमत्ता ही भांडवली मालमत्ता आहे;
2. हस्तांतरित केलेली मालमत्ता मागील वर्षात कधीही हस्तांतरित केली असेल;
3. आणि जर या भांडवली हस्तांतरणातून काही नफा मिळाला असेल तर;
भांडवली नफ्याचे मूल्यमापन हे साधारणत: मालमत्तेची मिळकत कालावधीच्या आधारे केले जाते आणि त्याचे दीर्घकालीन किंवा अल्पकालीन भांडवली नफा म्हणून वर्गीकरण केले जाते.
व्याज, लाभांश आदींमधून मिळणारे उत्पन्न
विविध योजनांद्वारे केलेल्या बचतीवर मिळणारे व्याज (Interest), लाभांश (Dividend) हे निवृत्तीनंतरचे मोठे उत्पन्न असते. या व्याज देणाऱ्या सुरक्षित योजना असल्या तरी त्या करपात्र उत्पन्नाचा भाग बनतात आणि त्यानुसार त्यावर टॅक्स आकारला जातो.
अशाप्रकारच्या उत्पन्नाचे योग्यप्रकारे नियोजन करून ऐनवेळी निवृत्तीनंतर टॅक्सरूपात होणारे आर्थिक नुकसान टाळू शकता.