Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mushroom Farming: महाराष्ट्रात अळंबी व्यवसायाला उधाण

Mushroom Farming

Mushroom Farming : अनेक आजारावर गुणकारी औषध (Medical Benefits) म्हणून प्रचलित असलेल्या अळंबीचा (Mushroom Business) व्यवसाय कुणीही सुरू करू शकतात. अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये, छोट्या जागेत आणि सहजरित्या हा व्यवसाय करता येतो.

शेतीला पूरक जोड व्यवसाय असणे ही अलिकडे निकड बनत आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन अशा विविधांगी जोड व्यवसायाला आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे अळंबी (Mushroom) व्यवसाय. भारतामध्ये या अळंबीची मागणी मोठ्या प्रमाणावर असून उत्पादन मात्र कमी आहे. जवळपास 50 हजाराच्या गुंतवणूकीवर हा व्यवसाय करता येतो. तेव्हा अळंबीच्या व्यवसायामध्ये यश मिळविलेल्या या काही उद्योजकांचा यशोगाथा पाहुया.

सरकारकडून अनुदान

अळंबी व्यवसायासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. आपल्याला जर मोठ्या स्केलवर प्लांट उभा करायचा असेल तर प्रति युनिटच्या एकुण खर्चाच्या 40 टक्के म्हणजे 8 लाख रूपयांपर्यंत अनुदान मिळते. अशा प्रकारे जास्तीत जास्त 20 लाखापर्यंते अनुदान मिळते. तसेच मशरूम स्पॉन वा कंपोस्ट यूनिटच्या उभारणीसाठी सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत क्रेडिट लिंक बॅक एंड सबसिडी म्हणजे 20 लाख रूपये पुरवले जातात.

ज्या शेतकऱ्यांना वा नव उद्योजकांना छोट्या प्रमाणावर व्यवसाय करायचा आहे ते उद्योजक केवळ 10 हजार ते 50 हजारामध्ये हा व्यवसाय सुरू करु शकतात. या व्यवसायासाठी कृषी विभागाकडून योग्य ते प्रशिक्षण ही दिले जाते.

प्राध्यापक ते अळंबी उद्योजक - तृप्ती धकाते

अळंबी या आरोग्यदायी, गुणकारी पदार्थाची जनजागृती करण्याच्या ध्यासाने पुण्यातील तृप्ती धकाते यांनी अळंबीचा व्यवसाय करण्यास सुरू केली. आज सेंद्रीय पद्धतीने अळंबीचे उत्पादन करून लाखोंच्या घरात त्या उलाढाल करीत आहेत. औरंगाबाद येथे एका कंपनीमध्ये काम करत असताना तृप्ती धकाते यांनी अळंबीवर विविध प्रयोग केले. या कारकिर्दीत त्यांना या विषयात आवड निर्माण झाली. 2018 साली पुण्यातील 2 हजार स्क्वेअर फुटच्या जागेमध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला घरच्यांना हा व्यवसाय पटवून देणे, अळंबीची विक्री करणे, अळंबी विषयी लोकांमध्ये असलेले विविध गैरसमज दुर करणे, अशा सगळ्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. मात्र, यावर मात करत तृप्ती यांनी आपला क्वालिटी मशरूम फार्म हा ब्रँड खूप चांगल्या प्रकारे स्थापित केला आहे. 

सुरूवातीला 2 हजार स्क्वेअर फुटच्या जागेत सुरू केलेल्या या व्यवसायाचे रूपांतर 10 हजार स्क्वेअर फुटच्या प्लांटमध्ये झाले आहे. पुण्यातील भोर येथील उमरेगावामध्ये हा प्लांट आहे. तृप्ती यांच्या सेंद्रीत पद्धतीने उत्पादित केलेल्या ओईस्टर अळंबीचे व त्यापासून बनवलेल्या इतर उत्पादनांचे आजघडीला संपू्र्ण भारतभर विक्री होत आहे. 
या व्यवसायातून तृप्ती धकाते यांची 20 ते 22 लाख रूपयांची वार्षिक उलाढाल होत असून, 12 लाख रूपये नफा मिळवत आहेत.

आता दुष्काळी भागातही अळंबीचे उत्पादन

मराठवाडा हे नाव घेताच पहिलं मनात येते ते म्हणजे दुष्काळी भाग. तेव्हा या दुष्काळी भागात अळंबी उगवू शकेल का हा प्रश्नच आहे. पण दुष्काळी भागात ही थंड प्रदेशात पिकणाऱ्या अळंबीचे चांगले उत्पन्न घेऊन व्यवसाय करता येतो. हे दाखवून दिले आहे ते परभणीतल्या मुरूंबा गावातील तीन तरुणांनी. योगेश झाडे, मंगेश चोपडे आणि दिलीप देशमुख या तीन तरुणांनी ही किमया करून दाखवली आहे. या तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात न जाता व्यवसायाचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी निवडला अळंबी उत्पादनाचा व्यवसाय. आज 15 एकरच्या जागेत हा व्यवसाय त्यांनी उभा केला असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते विक्री करत आहेत. या तिन्ही तरुणांचा हा छोटा प्लांट असला तरी वर्षाला ते जवळपास 5 लाखाची उलाढाल करत आहेत. आगामी काळात थेट ग्राहकांसोबत मोठ-मोठ्या कंपनीलाही अळंबी विक्री करण्याचा ध्येय या तरूणांनी ठेवले आहे.

कोकणातही आंबा, काजु, सुपारीसह आता अळंबी

कोकणामध्ये तुम्हाला आंबा, काजु, मासे भरपूर मिळतील मात्र अळंबी नाही. कोकणवासीयांची हिच गरज भागवण्याच्या उद्देशाने रत्नागिरीतल्या अनंत वाडेकर यांनी अळंबीचा व्यवसाय सुरू केला. महत्त्वाचे म्हणजे वाडेकर यांनी या व्यवसाय झिरो इन्वेस्टमेंट वर सुरू केला आहे. सेंद्रीय पद्धतीने अळंबीचे उत्पादन घेऊन त्यांची राजापूर, लांजा अशा जवळपासच्या बाजारपेठात विक्री करून आज चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा वा कोकण असो कोणत्याही वातावरणामध्ये हा व्यवसाय करता येतो. यासाठी गरज आहे ती फक्त योग्य प्रशिक्षणाची आणि जिद्दीची.