दक्षिण भारताती बड्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या मुरुगप्पा कुटुंबियांतील वाद अखेर मिटला आहे. या वृत्तानंतर शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी 21 ऑगस्ट 2023 रोजी मुरुगप्पा ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स वधारले.
कृषि, अभियांत्रिकी, वित्तीय सेवा, पॉलिमर कापड, ट्रॅव्हल अशा 29 वेगवेगळ्या व्यवसायात मुरुगप्पा ग्रुप आहे. या ग्रुपची उलाढाल जवळपास 74200 कोटी असून 73000 हून अधिक कर्मचारी आहेत. 40 देशांमध्ये विस्तारलेला मुरुगप्पा ग्रुप भारतातील आघाडीच्या उद्योग घराण्यांपैकी एक ओळखला जातो. मुरुगप्पा समूहाचे संस्थापक एम.व्ही मुरुगप्पन यांच्या निधनानंतर मुरुगप्पा कुटुंबियांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.
एम.व्ही मुरुगप्पन यांची ज्येष्ठ कन्या वाली अरुणाचलम यांच्यासोबत मुरुगप्पा कुटुंबियातील इतर सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. वाली अरुणाचलम यांनी अंबाडी इनव्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये संचालक पदाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यामुळे हा वाद टोकाला गेला होता.
मात्र या सर्व वादावर आता दोन्ही बाजूने सामोपचाराने तोडगा काढण्याचे ठरवले आहे. मुरुगप्पा ग्रुप आणि दिवंगत एम.व्ही मुरुगप्पन यांची पत्नी वेलाची मुरुगप्पन आणि कन्या वाली अरुणाचलम यांच्याशी मतभेद मिटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुरुगप्पा समूहाच्या नेतृत्वावरुन मुरुगप्पा कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाले होते. अखेर रविवारी 20 ऑगस्ट 2023 रोजी मुरुगप्पा कुटुंबातील सदस्यांनी आपसांतील वाद मिटवत सामोपचाराने तोडगा काढण्यास सहमती दर्शवली.
येत्या 90 दिवसांत मुरुगप्पा ग्रुपमधील कंपन्यांचे नेतृत्व, कुटुंबियांचे विशेषाधिकार याबाबत येत्या 90 दिवसांत सर्वानुमते तोडगा काढला जाईल, असे मुरुगप्पा कुंटुंबियांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वाद मिटला, शेअर्स वधारले
- दीर्घकाळापासून सुरु असलेल्या मुरुगप्पा कुटुंबियांमधील वादावर पडदा पडला आणि त्याचे सकारात्मक पडसाद शेअर मार्केटवर उमटले.
- मुरुगप्पा ग्रुपमधील शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स आज वधारले.
- कार्बोरंडम युनिव्हर्सलचा शेअर 5.55% वधारला.
- चोलामंडलम इनव्हेस्टमेंट अॅंड फायनान्सचा शेअर 3.47% आणि कोरोमंडेल इंजिनिअरिंगचा शेअर 4.05% ने वधारला.
- चोलामंडलम फायनान्शिअल होल्डिंग आणि कोरोमंडेल इंटरनॅशनलचा शेअर अनुक्रमे 2.94% आणि 2.22% ने वधारला.
- ईआयडी पॅरि इंडियाचा शेअर 2.82% ने वधारला. ट्युब इन्व्हेस्टमेंटचा शेअर 3.05% ने वधारला.
- शांती गिअर्सचा शेअर 3.64% ने वधारला तसेच वेंड्ट इंडियाचा शेअर 4% ने वधारला.
- सीजी पॉवरचा शेअर सुरुवातीला 1.25% ने वधारला होता मात्र अखेर तो 2.01% घसरणीसह स्थिरावला.