Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Muhurat Trading 2023: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर स्टॉक्स खरेदी करताय? जाणून घ्या बेस्ट गुंतवणूक स्ट्रॅटेजी

Muhurat trading 2023

Image Source : https://www.freepik.com/

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने व शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने स्टॉक्स खरेदी करत गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.

भारतात दिवाळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेकजण नवीन घर, गाडी, सोने खरेदी करतात. हा दिवस गुंतवणुकीसाठी देखील शुभ असल्याने सोने व शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. दिवाळीचे विशेष महत्त्व असल्याने सुट्टीच्या दिवशी देखील काही तासांसाठी शेअर मार्केट सुरू ठेवले जाते. 

या वर्षी 12 नोव्हेंबर 2023 ला लक्ष्मीपुजनाच्या दिवशी 1 तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र सुरू राहील. संध्याकाळी 6 ते 7.15 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र सुरू राहणार आहे. मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने गेल्या वर्षभरात कोणते स्टॉक्स मल्टीबॅगर ठरले व पुढील वर्षासाठी गुंतवणूकदारांची काय स्ट्रॅटजी असायला हवे, त्याबाबत जाणून घेऊया. 

मुहूर्त ट्रेडिंगची वेळी या चुका टाळा 

मुहूर्त ट्रेडिंगचा दिवस शुभ असला तरी या निमित्ताने गुंतवणूक करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. मुहूर्त ट्रेडिंगचा कालावधी हा केवळ 1 तास असतो. त्यामुळे या एक तासात मोठी ऑर्डर देणे टाळा. याशिवाय फ्यूचर अँड ऑप्शन्स, कमोडिटीजमध्ये ट्रेड करणे टाळा. तुम्ही जर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आधीच त्याबाबत सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे. 

विक्रम संवत 2079 मध्ये या स्टॉक्सने केली शानदार कामगिरी

गेल्या दिवाळीपासून ते आतापर्यंतचा कालावधी गुंतवणूकदारांसाठी शानदार ठरला आहे. विक्रम संवत 2079 (हिंदू पंचांग) मध्ये अनेक शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळाला आहे. खासकरून, स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समधून चांगला परतावा मिळाला आहे. मागील वर्षभरात स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 30 टक्के तर सेंसेक्समध्ये 9 टक्के वाढ झाली आहे.

याच कालावधीत जवळपास 172 स्मॉल कॅप स्टॉक्सने गुंतवणुकदारांना दुप्पट-तिप्पट परतावा दिला आहे. यामध्ये जय बालाजी इंडस्ट्रीने सर्वाधिक 1000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला. या पाठोपाठ लॉयड्स एंटरप्रायझेस, जिंदाल सॉ, मॅगेलॅनिक आणि अपोलो मायक्रो सिस्टम्समध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले. 

मिडकॅपमध्ये आरईसी लिमिटेड, आयआरएफसी आणि पॉवर फायनान्स कॉर्प देखील जबरदस्त परतावा देणाऱ्या स्टॉक्समध्ये अव्वल स्थानी आहेत. याशिवाय, नवीन लिस्टेड झालेल्या स्टॉक्सपैकी कायन्स टेक्नोलॉजी, प्लाझा वायर्स, सेन्को गोल्ड, साइएंट डीएलएम आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकने देखील चांगला परतावा दिला. वर्षभरात एसआयपीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत देखील प्रचंड वाढ झाली आहे. यापैकी सर्वाधिक गुंतवणूक ही मिड आणि स्मॉल कॅप फंडमध्ये करण्यात आली. 

विक्रम संवत 2080 मध्ये काय असावी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी?

संवत 2079 प्रमाणेच संवत 2080 हे देखील गुंतवणूकदारांसाठी चांगले असेल, अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या वर्षी निफ्टीने 20000 चा आकडा गाठला. तर संवत 2028 मध्ये निफ्टी 22,500 चा आकडा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने गुंतवणूकदार त्यांचा भविष्यात पोर्टफोलियो कशाप्रकारे अधिक चांगला होईल व जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल, यासाठी स्ट्रॅटेजी तयार करू शकतात.

गेल्याकाही दिवसातील आयपीओचा ट्रेंड पाहता पुढील वर्षी यात गुंतवणुकीचा विचार करू शकता. मात्र, कोणच्या सांगण्यावरून व केवळ किंमतीवरून यात थेट गुंतवणूक करणे टाळावे. संपूर्ण अभ्यास करूनच आयपीओसाठी अर्ज करावा.

तुम्ही अल्पकालीन की दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणुकीचा विचार करत आहात, यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तसेच, सर्व पैसे एकाच स्टॉक्स किंवा सेक्टरमध्ये गुंतवणे चांगले नाही. तुम्ही पोर्टफोलियोमध्ये विविधता आणून नुकसान टाळू शकता. मागील वर्षी एखाद्या स्टॉक्सने चांगला परतावा दिला आहे म्हणून त्यातच गुंतवणूक करणे व्यवहार्य ठरणार नाही. हे स्टॉक्स तसाच परतावा देतील की नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे एकदम जास्त परताव्याच्या तुलनेत ज्या स्टॉक्सची कामगिरी सातत्याने चांगली आहे, त्यात गुंतवणूक करावी. थोडक्यात, तुम्ही जर दिवाळीच्या निमित्ताने स्टॉक्स खरेदी करत असाल तर ही नक्कीच गुंतवणुकीच्या दृष्टीने एक चांगली सुरूवात ठरू शकते.

(डिसक्लेमर : आयपीओ किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स व आयपीओ खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)