उद्योग-व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग वाढताना दिसत आहे. अनेक महिला आज उद्योजक म्हणून समोर येत असून, याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील चांगला परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत.
सरकारकडून देखील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यापैकीच एक मुद्रा योजना आहे. या योजनेंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
मुद्रा योजनेचा महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, याबाबत जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
मुद्रा योजना काय आहे?
केंद्र सरकारद्वारे एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजनेची ( Micro Units Development & Refinance Agency Ltd ) सुरुवात करण्यात आली. यांतर्गत शेती व कॉर्पोरेटशी संबंधित नसलेल्या लघू उद्योगांना 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. कोणतीही भारतीय व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. परंतु, या योजनेंतर्गत स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
18 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. महिलांना कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही तारणाची गरज नाही. महिला या योजनेंतर्गत मिळालेल्या कर्जाचा वापर फोन दुरुस्ती, सर्व्हिसिंग सेटर, स्पा, ब्युटी पार्लर, शिवणकाम इत्यादी व्यवसायासाठी करू शकतात. घेतलेले कर्ज कमीत कमी 3 वर्ष व जास्तीत जास्त 5 वर्षांच्या आत फेडणे गरजेचे आहे. कर्ज घेणाऱ्यांना एक डेबिट कार्ड देखील दिले जाते. या डेबिट कार्डच्या मदतीने उद्योगासाठी पैसे वापरता येतील.
मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- व्यवसायाशी संबंधित इतर कागदपत्रे
मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी कसा करता येईल अर्ज?
तुम्ही www.udyamimitra.in या वेबसाइटच्या माध्यमातून कर्जसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. याशिवाय, व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँक, सहकारी बँका व NBFCs सारख्या कर्ज देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून देखील कर्ज मिळेल. तुम्ही या बँकांमध्ये जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. तसेच, कर्जाचे व्याजदर हे बँकांकडून ठरवले जाते.
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचा वाटा सर्वाधिक
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचा वाटा सर्वाधिक आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत देण्यात आलेल्या एकूण 30.64 कोटी कर्जांपैकी जवळपास 69 टक्के कर्ज महिलांना देण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत महिला उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जात असून, त्यांना कमाई व रोजगाराच्या संधी मिळत आहे.