Mortgage Loan: घरासाठी घेतलेले कर्ज तुम्ही लवकरात लवकर फेडले तर उर्वरित आयुष्यात तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही पैशांची बचत करून दीर्घकाळासाठी एक चांगला फंड निर्माण करू शकता. तर आम्ही तुम्हाला कर्ज लवकर फेडण्याच्या काही टीप्स सांगणार आहोत.
तारण कर्जामध्ये एखादी वस्तू तारण म्हणजेच गहाण ठेवून त्याबदल्यात कर्ज घेतले जाते. तारण कर्जाचे काही बेसिक प्रकार देखील आहेत. यातील सर्वमान्य प्रकार म्हणजे होम लोन. होम लोन हा तारण कर्जाचाच एक प्रकार आहे. होम लोनमध्ये प्रॉपर्टी बँकेकेड तारण ठेवून त्या बदल्यात अर्जदाराला कर्ज दिले जाते. त्यामुळे तारण ठेवलेली वस्तू लवकरात लवकर मोकळी करण्यासाठी आणि कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी तारण कर्ज लवकर फेडणे संयुक्तिक ठरू शकते. यासाठी तुम्ही खालील काही पर्यायांचा वापर करून तुमच्यावरील कर्जाचा ताण कमी करू शकता.
Table of contents [Show]
कर्जाचा कालावधी कमी करा
बँका होम लोन दीर्घकाळासाठी म्हणजे किमान 20 ते 30 वर्षांसाठी देतात. त्यामुळे कर्जदाराचा मासिक हप्ता हा कमी पडतो. पण तुम्ही जर कर्जाचा कालावधी कमी केला, तर आपोआप ईमआयचा हप्ता वाढतो. यामुळे तुमचे कमी कालावधीत कर्ज फेडले जाऊ शकते. यामुळे तुमचे व्याजाच्या रूपाने दिले जाणारे पैसेदेखील कमी होतात.
प्रत्येक वर्षी 1 ईएमआय जास्त भरा
कर्जाच्या जाचातून लवकर सुटका करून घ्यायची असेल तर, कर्जाची परतफेड लवकर करणे, याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. तुम्ही जर बँकेच्या नियमाप्रमाणेच कर्जाचे हप्ते भरत असाल तर, तुम्हाला ते कर्ज फेडण्यासाठी नक्कीच 20 ते 30 वर्षे लागू शकतात. यामुळे तुम्हा कर्जाच्या रकमेच्या दुप्पट पैसे बँकेकडे व्याज म्हणून भरता. हे सर्व टाळण्यासाठी दरवर्षी तुम्ही एक जास्तीचा ईएमआय भरला तर तुमच्या कर्जातील मुद्दल रक्कम कमी होईल. त्यामुळे कर्जाचा कालावधी आणि व्याजही कमी होण्यास मदत होईल.
कर्ज ट्रान्सफर करा
तुम्ही ज्या व्याजदराने कर्ज घेतले आहे. त्याच्या व्याजदरात बँकेकडून भरमसाठ वाढ होत असेल आणि त्यामुळे तुमचे महिन्याचे बजेट कोलमडत असेल. तर तुम्ही तुमचे कर्ज ट्रान्सफर करू शकता. जी बँक तुम्हाला सध्याच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजाने कर्ज देत असेल तर तुम्ही तुमचे लोन लगेच ट्रान्सफर करून घ्या. यामुळे तुमची एकूण कर्जाची रक्कम कमी होण्यात मदत होऊ शकते आणि त्यामुळे कर्जसुद्धा लवकर फेडले जाऊ शकते.
कर्जाची मुद्दल कमी करा
कर्ज घेतल्यानंतर तुमच्याकडे जर एखादी मोठी रक्कम आली, तर ती रक्कम कर्जाची मुद्दल रक्कम परतफेड करण्यासाठी वापरा. अशा पद्धतीने तुम्ही तर प्रत्येक 2 महिन्यांनी एक ठराविक रक्कम मुद्दल कमी करण्यासाठी वापरली तर तुमचे कर्ज आपोआप कमी होईल. त्यामुळे त्यावरील कर्जाचा कालावधी आणि व्याज असे दोन्ही कमी होऊ शकते.
अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने तुमची कर्जाची रक्कम कमी करू शकता. यामुळे तुमची कर्जाच्या विळख्यातून लवकर सुटका होऊ शकेल. कर्जाच्या हप्त्यातून लवकर सुटका झाल्यावर तुमची बचत वाढू शकते. तसेच भविष्यातील गोष्टींचे तुम्ही प्लॅनिंग सुद्धा करू शकता.