आज मुंबईकरांवर महागाईचा दुहेरी आघात झाला आहे. आधी सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ केली आणि आता दुधाच्या दरातही वाढ (Milk Price Hike) झाली आहे. मुंबईत बुधवार, 1 मार्च 2023 पासून दुधाच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई दूध उत्पादक संघाने (एमएमपीए) म्हशीच्या दुधाच्या दरात 5 रुपयांनी वाढ केली आहे. याआधी अमूल आणि मदर डेअरीनेही त्यांच्या दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली होती.
Table of contents [Show]
सप्टेंबर 2022 नंतर दुधाच्या दरात झालेली दुसरी मोठी वाढ
यापूर्वी सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. MMPA ने आज सकाळी जाहीर केलेल्या दरानुसार, आता मुंबईत म्हशीच्या एका लिटर दुधाची किंमत 85 रुपये असेल, जी आधी 80 रुपयांना मिळत होती. नवीन दर 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहतील आणि त्यानंतर असोसिएशन पुन्हा एकदा किमतींचे पुनरावलोकन करेल. सप्टेंबर 2022 नंतर मुंबईतील दुधाच्या दरात झालेली ही सर्वात मोठी दुसरी दरवाढ आहे.
...म्हणून दूध महागले
एमएमपीएचे अध्यक्ष सीके सिंग म्हणाले की, दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय एमएमपीएच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. चारा, पेंढा व इतर वस्तूंच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. खर्च वाढल्याने दुधाच्या दरात वाढ करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अहवालानुसार, मुंबईत दररोज 50 लाख लीटर म्हशीच्या दुधाची विक्री होते.
गाईचे दूधही महागले
मुंबईत केवळ म्हशीच नाही तर गाईचे दूधही महागले आहे. फेब्रुवारीमध्ये, ब्रँडेड उत्पादकांसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख गाय दूध उत्पादक संघांनीही प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती. दुभत्या जनावरांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने दूधाच्या किंमती वाढत असल्याचे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे.
दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता
दुधाच्या दरवाढीचा परिणाम फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नसून त्यापासून बनवलेल्या उत्पादनांवरही त्याचा परिणाम होतो. आगामी काळात दही, तूप, पनीर या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.