भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात पाय रोवण्याची तयारी केली आहे. जागतिक बाजारपेठेत सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात भारताची लवकरच उत्तम अशी कामगिरी दिसण्याचे चित्र सध्या आहे. फॉक्सकॉन व्यतिरिक्त अनेक बड्या आणि दिग्गज अशा सेमीकंडक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी भारतातील गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखवले आहे. मागील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या या भेटीनंतर अमेरिकन सेमीकंडक्टर निर्माता कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजी (Micron Technology) गुजरातमध्ये 2.75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून देशातील पहिला सेमीकंडक्टर चिप उत्पादन कारखाना उभारणार आहे.
रोजगाराच्या संधी!
गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित ‘सेमीकॉन इंडिया कॉन्फरन्स-2023’ मध्ये बोलताना मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ संजय महरोत्रा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी हेही सांगितले की सेमीकंडक्टर निर्मिती कारखाना सुरु केल्यानंतर हा देशातील पहिला-वहिला सेमीकंडक्टर कारखाना ठरणार आहे. या माध्यमातून येत्या काही वर्षात तब्बल 20,000 रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. यात 5000 प्रत्यक्ष स्वरूपाचे आणि 15,000 अप्रत्यक्ष स्वरूपाचे रोजगार असणार आहेत असे ते म्हणाले.
? PM @narendramodi meets with Sanjay Mehrotra, President and CEO of @MicronTech in Gandhinagar, Gujarat
— PIB in West Bengal (@PIBKolkata) July 28, 2023
Discussion held on Micron Technology's plans to bolster the semiconductor manufacturing ecosystem within India
Read: https://t.co/J9xCexvKb5pic.twitter.com/YLxYHVLAz3
या कंपनीच्या निमित्ताने जगभरातील सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात भारताचा सहभाग वाढणार असून, सध्याची एकूण मागणी बघता भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन प्रक्रिया देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणेल असे त्यांनी म्हटले आहे.
Advanced Micro Devices (AMD) गुंतवणुकीसाठी इच्छुक!
फॉक्सकॉन, मायक्रोन या सेमीकंडक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी भारतात गुंतवणुकीला सुरुवात केली असताना दुसरीकडे, आणखी एक अमेरिकन बहुराष्ट्रीय सेमीकंडक्टर निर्माता Advanced Micro Devices (AMD) कंपनीने देखील भारतात निर्मिती कारखाना सुरु करण्याची घोषणा केली आहे. येत्या 5 वर्षात भारतात सुमारे 3,300 कोटी रुपयांची गुंतवणुक करण्याची घोषणा कंपनीने केली आहे.