Lottery for 10 thousand houses of MHADA in South Mumbai: मुंबईत स्थायिक झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपले स्वत:चे हक्काचे घर असावे असे कायम वाटत असते. हे घर दक्षिण मुंबईत असेल तर! दक्षिण मुंबई म्हणजे स्वप्ननगरी हा परिसर सगळ्यांना कितीही आवडत असला, तरी घर घेणे म्हणजे गगनाला स्पर्श करण्यासारखेच आहे. नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, मुंबईकरांची साऊथ मुंबईमध्ये घर खरेदीची इच्छा पूर्ण होणार आहे. थेट साऊथ मुंबईमध्ये (SOBO: South Bombay) महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची, म्हणजेच म्हाडाची (MHADA: Maharashtra Housing and Area Development Authority) घरे बांधली जाणार आहेत. कुलाबा (Colaba) येथे म्हाडा दहा हजार घरांची लॉटरी काढणार आहे अशी माहिती दिली.
मुंबईमध्ये म्हाडाच्या मालकिच्या अनेक जागा आहेत, त्यात कुलाबा परिसरातही त्यांची जागा आहे. तेथील चार एकर जमिनीवर गृह प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामुळे म्हाडा संक्रमण शिबीर भू-खंडाचा विकास होईल, तसेच 40 वर्षांनी मोडकळीस आलेल्या इमारतींमधील नागरिकांना हक्काचे घर मिळेल.
कुलाब्यातील चार एकर जमिनीवर 10 लाख चौरस फुटांचे बांधकाम करणे शक्य आहे. तर या गृह प्रकल्पाद्वारे जवळपास दहा हजार सदनिका उपलब्ध करता येऊ शकतात, असे प्राथमिक निरिक्षणावरुन म्हाडाने सांगितले आहे, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
सर्वात महागड्या ठिकाणी, स्वस्त घर?
मुंबई सात बेटांनी बनली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. यातील दक्षिणेपासूनचे पहिले बेट हे कुलाबा होय. कुलाबा या ठिकाणाकडे किंवा बेटाकडे पोर्तुगीज आणि इंग्रजांनी विशेष लक्ष दिले नाही. दक्षिणेपासून तिसरे बेट होते, मुंबई त्याकडेच प्रामुख्याने इंग्रज आणि पोर्तुगीजांनी लक्ष दिले. याच भागत ब्रिटीश राहात होते. कुलाब्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती होती. यावरुनच कुलाभात हे नावे पडले असावे असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. कुलाब्याचे नाव कुलाभात किंवा कोलाभात नंतर कुलाबास किंवा कोलाबास असे अपभ्रंश होत शेवटी कुलाबा झाले.
ब्रिटीश काळात सर्व सात बेटे एकत्र आली, मुंबईचा कायापालट झाला आणि ते देशातले महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र बनले. व्यवसाय आणि लोकसंख्या वाढू लागल्याने कुलाब्यातील जागा वापरली जाऊ लागली आणि यानिमित्ताने तेथे बदल झाले. मुख्य म्हणजे, जसे आता ठाणे, वसई - विरार, पालघर हे भाग मुंबईच्या जवळ असल्याने आपोआप प्रगत झाले किंवा शहरीकरण जलद झाले तसेच कुलाबा फोर्ट भागाच्या जवळ असल्यामुळे येथेही बदल लवकर झाले. चर्चची बांधणी, क्लब, टाटांनी बांधलेले ताज महाल हॉटेल, गेट ऑफ इंडियाची उभारणी आदी सगळ्यांमुळे कुलाब्याची शान वाढली. आज कुलाबा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा परिसर आहे. याच परिसरात म्हाडा, जे सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ओळखले जाते, ते येथे घरे बांधणार आहे. नागरिकांच्या मनातील साऊथ मुंबईत घर घेण्याच्या सुप्त इच्छेला पूर्ण करणार आहे. मात्र कुलाब्यातील जागेचा सध्या भाव प्रति चौरस फूटांची किंमत 40 ते 45 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबईतील सर्वात महागडी घरे कुलाबा येथे आहेत. दुसरीकडे, म्हाडा स्वस्त घरे देत असली तरी, बाजार भावाच्या 25 ते 30 टक्के कमी दराने देते, त्यामुळे सामान्यांना कितपत कुलाब्यातील घरे परवडतील हा विचार करण्याचा मुद्दा आहे.